सातारा प्रतिनिधी । दिल्ली येथे नुकतेच ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्सहात पार पडले. या संमेलनाच्या संयोजन समितीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा कोरेगाव तालुक्यातील वेळू गावचे सुपुत्र विक्रम शिंदे यांचा खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दिल्ली येथे विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि छ. संभाजी महाराज विचारमंचाचे मुख्य संयोजक डॉ. शरद गोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक आणि सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोळक, बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सुवर्णा चव्हाण, कवी संमेलनाध्यक्ष युवराज नळे, कवी रमेश रेडेकर, कवी अमोल कुंभार आदी उपस्थित होते.
या संमेलनासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जवळपास १४०० साहित्यिकांना विशेष रेल्वेने दिल्लीला नेण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी या साहित्ययात्री रेल्वे मधून सर्व साहित्यिकांबरोबर प्रवास केला. जगातील पहिल्या धावत्या रेल्वेतील साहित्ययात्री संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छ. संभाजी महाराज विचारपिठावरील नियोजनाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल कवी विक्रम शिंदे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
डॉ. शरद गोरे यांच्या मुख्य संयोजनाखाली सयाजीराजे गायकवाड सभा मंडपातील छ. संभाजी महाराज विचारपीठ हे दिल्लीतील संमेलनाचे विशेष आकर्षण झाले होते. या खुल्या विचारपीठाच्या माध्यमातून ३०० हून अधिक साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. या विचारपीठाच्या यशस्वितेसाठी केलेल्या उत्तम संयोजनाकरिता खा. सुप्रिया सुळे, संजय नहार आणि डॉ. शरद गोरे यांनी कवी विक्रम शिंदे कौतुक केले. या माध्यमातून साहित्य सेवा आणि साहित्यिकांची सेवा करता आली.
साहित्य सेवेसाठी छोटा खारीचा वाटा : कवी विक्रम शिंदे
दिल्लीत झालेल्या साहित्य मेळ्यात साहित्य सेवेसाठी छोटा खारीचा वाटा उचलता आला. साहित्य महामंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, राज्यसरकार, सर्व साहित्यिक आणि सरहद्द संस्थेने हे संमेलन यशस्वी केल्याचा आनंद आहे, अशी भावना कवी विक्रम शिंदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना व्यक्त केली.