अमेरिकेत नीलमच्या कानावर पडले वडिलाचे शब्द; वडिलांची हाक ऐकताच डोळ्यांच्या पापण्या हलवल्या…

0
1351
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपासून कार अपघातात नीलम शिंदे ही तरुणी उपचार घेत आहेत. कार अपघातात जखमी झालेल्या नीलमवर युसी डेव्हिस मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिला सोमवारी मध्यरात्री कॅलिफोर्नियात वडील तानाजी शिंदे आणि भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अतितक्षता विभागात पोहचताच वडिलांनी मारलेली हाक कानावर पडताच नीलमने डोळ्यांच्या पापण्यांनी प्रतिसाद दिला.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज या गावाची नीलम शिंदे ही तरुणी कॅलिफोर्निया येथे गेल्या चार वर्षांपासून श‍िकत आहे. तिचा 14 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. तिच्यावर सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेली अनेक दिवस अमेरिकेला जाण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे इमर्जन्सी व्हिसासाठी प्रयत्न करीत होते. अखेर नीलमला भेटण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे आण‍ि मामेभाऊ गौरव कदम यांना आपत्कालीन परिस्थितीत अमेर‍िकेचा व्हिसा अखेर मंजूर झाला. काल सोमवारी मध्यरात्री वडील व भाऊ अमेरिकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी नीलमची दवाखान्यात जाऊन भेट घेतली. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे नीलमवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमबरोबर वडिलांचा संवाद झाला नाही. मात्र, तिची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडिलांची हाक ऐकल्यावर डोळे बंद असतानाही तिच्या बुबुळांची हालचाल टिपली.

नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिचे वडील व मामाचा मुलगा सॅकरामेन्टोला निघाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री ते पोहोचले. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेअकरानंतर नीलमवर उपचार करणारे डाॅक्टर तिच्या कुटुंबीयांशी बोलून उपचारांची पुढील दिशा ठरविणार आहेत.

आज रात्री पुन्हा वडील आणि नीलमची भेट होणार : संजय कदम

अपघातग्रस्त नीलम शिंदे यांचे मामा संजय कदम यांनी नुकतीच ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीलमचे वडील आणि भाऊ अमेरिकेतमध्यरात्री दाखल झाले असल्याची माहिती दिली. नीलम उपचारास प्रतिसाद देत असून आज रात्री पुन्हा निलमी आणि वडील या दोघांची भेट होणार असल्याची माहिती नीलमचे मामा संजय कदम यांनी दिली आहे.