कराड प्रतिनिधी । कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टीफिशियल इंटिलिजन्स (ए.आय.) तंत्रज्ञानाचा आहे. ए.आय. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे स्वरुप बदलणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातही याचा प्रभाव वाढू लागला आहे. अशावेळी ‘ए.आय.’च्या युगात विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहत, आपली ज्ञानकौशल्ये वृद्धींगत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्र-कुलगुरु डॉ. मीना चिंतामणेनी यांनी केले.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, गुलबर्गा विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठात दुसऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘औषधनिर्माण विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अलीकडील प्रगती’ या विषयावर होणाऱ्या या परिषदेत देशभरातील ४०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे होते.
प्र-कुलगुरु डॉ. मीना चिंतामणेनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, संशोधन संचालिका ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, गुलबर्गा विद्यापीठातील प्रा. डॉ. जी. एम. विद्यासागर, अंतर्गत गुणवत्ता विभागाचे संचालक डॉ. एस. आर. पाटील, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव उपस्थित होते.
यावेळी डॉ. चिंतामणेनी म्हणाल्या, शिक्षण हे सर्वांत शक्तिशाली साधन असून, याद्वारे तुम्ही तुमच्या सभोवतालचे जग बदलू शकता. पण यासाठी तुम्हाला ज्ञानाच्या कक्षा रुंदाविण्याची गरज आहे. तसेच सध्याच्या काळातील विविध क्षेत्रातील प्रगतीची जाणीवही असणे आवश्यक आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात थ्री डी प्रिंटींग प्रणाली सर्वात कार्यक्षमतेने वापरली जात असून, अशा नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात करुन घ्यायला शिकले पाहिजे.
यावेळी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे म्हणाले, दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करायची असेल, तर तुम्हाला संशोधन क्षेत्रातही जावे लागेल. कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी नेहमीच विद्यापीठात संशोधन संस्कृती रुजविण्यास प्राधान्य दिले आहे. कृष्णा विद्यापीठातील फार्मसी अधिविभाग वेगाने प्रगती करत आहे. या विभागाने एन.आय.आर.एफ. रँकिंगमध्ये पहिल्या प्रयत्नात देशात ६७ वा क्रमांक मिळविला आहे. वैद्यकीय क्षेत्रात फार्मासिस्टची भूमिका नेहमीच अद्वितीय राहणार आहे.
यावेळी डॉ. जी. हिमाश्री आणि प्रा. डॉ. जी. एम. विद्यासागर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्तविक केले. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जे. ए. सावळे यांनी आभार मानले.