सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर पालिका प्रशासनाच्या लहरी कारभारामुळे महाबळेश्वर येथील पाणी प्रश्न पेटला आहे. पाणीटंचाई व घरपट्टीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाबळेश्वर येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
वेण्णा धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही दोन महिने महाबळेश्वरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महाबळेश्वरात पालिकेच्या कारभाराविषयी संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात चर्चा करून पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रमोद शेटे यांनी येथील श्री राम विठ्ठल मंदिरात नागरिकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पालिकेतील प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नापसंती व्यक्त केली. पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी पालिकेवर नागरिकांचा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
यावेळी पार पडलेल्या बैठकीस माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, उद्धवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, शिंदेसेनेचे शहरप्रमुख विजय नायडू, माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुखे, विशाल तोष्णीवाल, संजय ओंबळे, समीर सुतार, रमेश शिंदे, महेश गुजर, राजेंद्र पंडित उपस्थित होते.