सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मनीषा काळे यांच्याविरोधात नगरपंचायतीच्या १६ सदस्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे आज (सोमवार) अविश्वास ठराव दाखल केला आहे.
नगरपंचायतीची निवडणूक २०२२ मध्ये झाली. त्यामध्ये नऊ महिला व आठ पुरुष सदस्य आहेत, तर ११ फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या पदाधिकारी निवडीत सौ. काळे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली; परंतु त्या नगराध्यक्ष पदावर आल्यापासून चुकीच्या पद्धतीने वागत आहेत.
त्या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानीपणे काम करीत आहेत. त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. शहराच्या विकासासंदर्भातही त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. नगराध्यक्षा सौ. काळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करीत असून, तो मंजूर होण्याबाबत विशेष सभा बोलविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर नगरसेविका आरती काळे, राधिका गोडसे, मनोज कुंभार, शोभा बडेकर, रेखा माळी, रेश्मा बनसोडे, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, शोभा ओंकार चव्हाण, वायदंडे, अभयकुमार देशमुख, स्वप्नाली गोडसे, सुनील गोडसे, रोशना गोडसे, जयवंत पाटील, सचिन माळी यांच्या सह्या आहेत.