सातारा प्रतिनिधी । भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर यांनी या युद्धनौकेचे हस्तांतरण करण्याचा सन्मान मिळवला आहे. सुपुत्र कारवार नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे आहेत.
आयएनएस गुलदारचा वापर मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात पाण्याखालील पर्यटन आणि आर्टिफिशियल रिप पर्यटनासाठी केला जाणार आहे. या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे.
कॅप्टन जयवंत इंदलकर हे कारवार नौदल तळावर कार्यरत आहेत आणि त्यांनी देशभरातील नौदलाच्या विविध कॅम्पमध्ये उल्लेखनीय सेवा केली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सनदी अधिकारी सुरेश जाधव, माजी अपर राज्यकर आयुक्त विलासराव इंदलकर, मंत्रालय उपसचिव प्रकाश इंदलकर, माजी जॉइंट कमिशनर उत्तमराव इंदलकर, जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवडचे अध्यक्ष विश्वंभर बाबर, बाळासाहेब पिसाळ यांनी नौदल कॅप्टन जयवंत इंदलकर यांचे कौतुक केले आहे.