सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात ज्वारीचे उत्पादन होते. ज्वारी हे एक बहुमुखी पीक असून, धान्य, चारा, गोड पीक म्हणून वापरले जाते. ज्वारीचे पीक खरीप आणि रब्बी हंगामात घेतले जाते. यावर्षी पाऊस चांगला पडल्याने ऊसाबरोबर नगदी पिके जादा प्रमाणात लागण केल्याने ज्वारी पेरणीत घट झाली आहे. त्यामधील जनावरांना चारा म्हणून ज्वारी पीक घातल्याने ज्वारी उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.
फलटण तालुका रब्बीचा असला तरी तिन्ही हंगामात ज्वारी, बाजरी, ऊस, मका फळबागा भाजीपाला आदी नगदी पिके पावसाच्या व पाण्याच्या उपलब्ध प्रमाणे घेतली जातात. गतवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते. यावर्षी धरण क्षेत्रात व फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याबरोबर फलटण तालुक्यात शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
त्यामुळे संकलित गायींना चारा म्हणून मका पिकाचा वापर केला जातो; परंतु यावर्षी ऊस लागवड व मका पिके त्याबरोबर नगदी पिके शेतकऱ्यांनी घेतल्याने ज्वारी पेरणीत घट झाली झाली होती. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी ज्वारी जनावरांना चारा म्हणून कापून घातल्याने ज्वारी उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
रब्बीच्या अंतिम अहवालानुसार सुरुवातील जानेवारी महिन्यात १०१.५८ टक्के पेरणी झालेली. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीचा वाटा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीचे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख ३० हजार१०१ हेक्टर लागवड झाली आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्वच तालुक्यात ज्वारीची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात ३६ हजार ५४१ हेक्टर पेरणी झाली आहे. ज्वारीची उगणवण, वाढ दमदार झाली. सध्या थंडीचे प्रमाण कमी झाले असून उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे.
ज्वारीचे वैशिष्ट्य :
1) ज्वारी हे उच्च-ऊर्जा, दुष्काळ सहनशील पीक आहे.
2) इतर कृषी पिकांपेक्षा सीमांत जमिनीवर लागवडीसाठी चांगले अनुकूल आहे.
3) दुष्काळ सहनशीलता असल्याने, ज्वारी प्रामुख्याने कोरडवाहू पीक म्हणून घेतली जाते.
4) जागतिक स्तरावर ते पाचव्या क्रमांकाचे प्रमुख धान्य पीक म्हणून स्थान मिळवते.
धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे बागायती क्षेत्र
फलटण तालुका रब्बीचा असल्याने ज्वारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती; परंतु तालुक्यात धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्याचे पाणी आल्याने बागायती क्षेत्रात वाढवून ऊस व नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. त्यामुळे ज्वारी पेरणी क्षेत्रात घट झाल्याने उत्पादनातील घट होणार असल्याचे दिसत आहे.