सातारा प्रतिनिधी | स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानक व आगारांचे ऑडीट करण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील १० आगार व बसस्थानकांचे सुरक्षा ऑडीट पुर्ण झाले असून सातारा बसस्थानकाचे आज सोमवारी ऑडीट करण्यात येत आहे. ऑडीटचा एकत्रीत अहवाल मुंबई सेंट्रल ऑफीसला लवकरच सादर केला जाणार आहे.
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच नादुरूस्त व बंद असलेल्या बसेस मेढा येथील स्क्रॅप सेंटरमध्ये लावण्यात आल्या आहेत. तसेच बसस्थानक व आगाराच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा ऑडीटचे काम एसटी प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात मेढा, महाबळेश्वर, वाई, पारगाव-खंडाळा, फलटण, दहिवडी, वडूज, कराड, पाटण व कोरेगाव आगार व बसस्थानकाचे सुरक्षा ऑडीट महामंडळाचे जिल्हा सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे, वाहतूक पर्यवेक्षक व सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले आहे.
या ऑडीटमध्ये बसस्थानक व आगाराचे क्षेत्रफळ, सिमा सुरक्षा भिंत उंची व विस्तार, दैनिक प्रवाशी संख्या, दिवसातील एकूण बसेसच्या फेऱ्या, रात्र मुक्काम बसेसची संख्या, सुरक्षा रक्षकाची संख्या, पोलिस चौकी आहे काय? २४ तास पोलिस उपलब्ध असतात का? सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या, सीसीटीव्हीमध्ये न येणारे ब्लॅक स्पॉट, वाढीव सुरक्षा रक्षकांची आवश्यकता, बसस्थानकाला असणारे एकूण प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष रात्रीच्या वेळेस चालू असते का?
स्थानक प्रमुख कार्यालय स्थानकावर आहे की आगारात, प्रवाशी सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या आहेत याची पाहणी करण्यात येत आहे. सातारा बसस्थानक मोठे असल्याने सोमवारी या बसस्थानकाचे सुरक्षा ऑडीट केले जाणार असून त्याचा एकत्रीत अहवाल महामंडळाच्या सेंट्रल ऑफीसला सादर केला जाणार आहे.