सातारा प्रतिनिधी | माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार महाबळेश्वर येथे पाच दिवसाच्या मुक्कामासाठी परिवारासह रविवारी दाखल झाले. त्यांच्या या दौऱ्याबाबत पोलिस प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शरद पवार यांचे महाबळेश्वर येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका खासगी बंगल्याच्या हेलिपॅडवर आगमन झाले. ते कुटुंबीयांसह आले असून दि. 7 मार्चपर्यंत मुक्काम आहे. महाबळेश्वर पर्यटस्थळी राजकीय नेतेमंडळींचे विश्रांतीसाठी नेहमीच येणे जाणे असते. देशातील दिग्गज राजकारण्यांचे महाबळेश्वर प्रेम सर्वश्रुत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील महाबळेश्वरवर विशेष प्रेम होते. दरवर्षी स्व. बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येत असत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील दरवर्षी सहकुटुंब विश्रांतीसाठी महाबळेश्वर येथे येतात.
त्याचबरोबर अनेक नेते, नामवंत उद्योगपती, सिनेअभिनेते हवा बदलासाठी व निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर येथे येत असतात.खा. शरद पवार देखील नेहमी महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येतात. याआधी देखील अनेकवेळा ते महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी आले आहेत. खा. पवार यांच्या दौर्यावेळी पोलिस प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. खा. पवार राहत असलेल्या बंगला व परिसरात कुणालाही प्रवेश नसून ते कुणाला भेटणार अथवा पर्यटनास बाहेर पडणार नाहीत.