सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोर्याचा विकास व्हावा, दुर्गम भागातील जनतेचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. शासनाकडून जाहीर झालेल्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अभ्यास दौर्याचे नियोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौर्यादरम्यान तेथील स्थानिकांनी मांडलेल्या समस्यांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. सर्वात मोठी समस्या असलेल्या खंडित वीज पुरवठ्यावर पर्याय म्हणून सर्व गावे सोलर होण्याच्याद़ृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावोगावी त्याबाबत जागृतीही केली आहे. पर्यटनवाढीच्या द़ृष्टीनेही या दौर्यात मार्गदर्शन करण्यात आले.
दुर्गम अशा कांदाटी खोर्यातील गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडून विविध विभागाच्या अधिकार्यांसमवेत अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. कांदाटी खोर्यातील 56 गावात केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची पाहणी अधिकार्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह पंचायत समितीचे अधिकारी अभ्यास दौर्याच्या निमित्ताने थेट गावात पोहोचल्याने ग्रामस्थांनाही नवल वाटले. ग्रामस्थांनीही गावातील समस्या व अडीअडचणी पोटतिडकीने अधिकार्यांसमोर मांडल्या. त्या समस्यांचा निपटारा ऑन दी स्पॉट अधिकार्यांनी केला. जल जीवन मिशन यासह काही कामांना अडीअडचणी येत आहेत. त्यांची पाहणी करुन त्यावर मार्गही काढण्यात आला.
कांदाटी खोर्यात पर्यटनाच्यादृष्टीने खूप वाव आहे. महिला बचत गटांनी पर्यटकांच्या निवासासाठी होमस्टेची उभारणी करावी त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार आहेत. त्यासाठी निवासस्थान परिसराची स्वच्छता ठेवा. महावितरणबाबत अनेक गावातील ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या आहेत त्याबाबत महावितरणच्या अधिकार्यांना सूचना दिल्या जातील, असे याशनी नागराजन यांनी सांगितले. दुर्गम अशा चकदेवमध्ये विविध समस्यांचा पाडा ग्रामस्थांनी मांडला. मात्र चकदेवमध्ये विकास कामे करताना बर्याच अडचणी आहेत. या ठिकाणी विकासकामांसाठी साहित्य न्यायचे झाल्यास ते रत्नागिरी मार्गे आणावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामंस्थांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी तेटली येथून सुरु झालेल्या अभ्यास दौर्याचा प्रवास शनिवारी सायंकाळी तापोळा व बामणोली येथे विसावला. दोन दिवसाच्या या अभ्यासदौर्यातून अधिकार्यांना दुर्गम भागातील नागरिकांचे विविध प्रश्न व समस्या दिसून आल्या असून त्या मार्गी लावण्यासाठी अधिकारी पुढाकार घेतील हेच यातून स्पष्ट होते.