सातारा प्रतिनिधी | सातारा नगरपालिकेचा सन 2025-2026 या आर्थिक वर्षाचा 642 कोटी 95 लाख 45 हजारांचा अर्थसंकल्प 3 लाख 60 हजार 919 रुपयांच्या शिलकीसह गुरुवारी पार पडलेल्या अर्थ संकल्पाचा सभेत मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात शहरासह हद्दवाढ भागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
अर्थ संकल्पच्या सभेत मुख्याधिकारी अभिजित बापट म्हणाले की, सातारा नगरपालिकेचे 2023-2024 चे सुधारित अंदाजपत्रक 642 कोटी 95 लाख 45 हजारांचे आहे. 3 लाख 60 हजार 919 रुपये शिलकीची रक्कम आहे. शहराचा झालेला अडीचपट विस्ताराचा विचार करून विविध विकासकामांसाठी या अर्थसंकल्पात बिग बजेट तरतूद केली आहे. 2020 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर मालमत्ता कर मागणी देयके देण्यात आली असून, नागरिकांचा कर भरण्यास प्रतिसाद मिळत आहे.
सातारा पालिका प्रशासकीय इमारत व दोन महत्वाच्या रस्त्यांची कामे वर्षभरात पूर्ण होणार आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याला जीआएस प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर वसुली तसेच भांडवली जमेत वाढ झाली आहे. यावर्षी त्यामध्ये आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे. हद्दवाढ झाल्यानंतर मनुष्यबळ अपुरे असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. चौपाटीवरील विक्रेत्यांचे त्याच परिसरात स्थलांतर करून त्याठिकाणी नागरिकांसाठी सेंट्रल पार्क करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले.
यावेळी भालचंद्र डोंबे यांनी अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली. यावेळी मुख्य लेखा परीक्षक अमृता परेदशी, अतिरिक्त मुख्याधिकारी ऐश्वर्या निकम, नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, नगररचनाकार मोरे, विद्युत अभियंता अविनाश शिंदे, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, विश्वास गोसावी, हिमाली कुलकर्णी, अतुल दिसले आदि उपस्थित होते.
नगरपालिकेचे 5 कोटी रुपये वाचणार
हद्दवाढ भागात पायाभूत सुविधांवर फोकस करण्यात आला आहे. कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करण्यात आली आहे. ‘माझी वसुंधरा अभियाना’त नगरपालिकेला 16 कोटींचे बक्षीस मिळाल्यामुळे कर्मचार्यांना वाढीव वेतनवाढ देण्यात आली. सातार्याला 2040 पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर बनवण्यात येणार आहे. सातारा पालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या 1.5 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 1 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारणी कामाचे आदेश देण्यात आले आहेत. पथदिवे, जलशुद्धीकरण केंद्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी लागणारी वीज नगरपालिका या प्रकल्पांतून स्वत: तयार करणार आहे. त्यामुळे नगरपालिकेचे 5 कोटी रुपये वाचणार आहेत.
गोडोली तळे सुशोभिकरण, 50 उद्याने उभारळे जाणार
कास धरण झाल्याने पाणीसाठा वाढला आहे. वाढीव पाण्यासाठी जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत. प्रत्येक नळ कनेक्शनला अत्याधुनिक मीटर बसवण्यात येणार आहे. गोडोली तळे सुशोभिकरण, 50 उद्याने उभारणे, पेढ्याचा भैरोबा परिसर विकसित करणे, महादरे तलाव बळकटीकरण व सुशोभिकरण करणे, आरोग्य सेवेसाठी वाहन खरेदी व नागरी सुविधा ऑनलाईन देण्यासाठी आधुनिक संगणक प्रणालीसाठी तरतूद करण्यात आली आहे. महिला बालकल्याण, दिव्यांग कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी प्रत्येकी 56 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
अमृत 2.0 योजनेतून अनेक दर्जेदार कामे होणार
शिवतीर्थ सुशोभिकरण, महामार्गावरील तीन उड्डाणपुलांचे सुशोभिकरण, अजिंक्यतारा किल्ला रस्ता सुधारणा, शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक ही कामे पूर्ण झाली आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभारणे व परिसर विकास करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचे सुशोभिकरण, लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक उभे करणे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पायाभूत सोयी सुविधांसाठी नगरोत्थान योजना, नागरी दलित्तेतर योजना, अमृत 2.0, हद्दवाढ क्षेत्र विकास कार्यक्रम, वैशिष्ट्यूपर्ण योजना या माध्यमातून भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी चार आकांक्षी शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. अमृत 2.0 योजनेतून गोडोली तळे पुनरूज्जीवन प्रकल्प, कास पाणीपुरवठा प्रकल्प, सातारा शहर पाणीपुरवठा आधुनिकीकरण प्रकल्प मंजूर झाला असून ही कामे सुरू आहेत.