मृत्यूशी झुंज देणाऱ्या नीलमच्या वडिलांसह मामांना अमेरिकन दूतावासाचा फोन; उद्या मुंबईत भेटीसाठी बोलवलं

0
1856
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव

कराड तालुक्यातील उंब्रज येथील नीलम तानाजी शिंदे (Neelam Tanaji Shinde) या तरुणीचा दि. १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत भीषण अपघात झाला. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली नीलम अपघातानंतर कोमात गेली असून तिच्यावर कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत्यूच्या दारात असलेल्या लेकीला पाहण्यासाठी वडिलांना इमर्जन्सी व्हिसा हवा असल्याने त्यांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर आज अमेरिकन दूतावासाने फोन करून मुंबईत बांद्रा येथील कार्यालयात भेटीसाठी व मुलाखती फोनकरून बोलवले आहे. त्यामुळे नीलमचे वडील व मामा उंब्रज येथून आज सायंकाळी मुंबईकडे रवाना होणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये नीलम शिंदे ही शिक्षण घेत आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी ती इव्हिनिंग वॉकला गेली असताना पाठीमागून एका कारनं तिला जोराची धडक दिली. अपघातात तिच्या दोन्ही हात, पाय आणि डोक्याला गंभीर इजा झाली. छातीला मार लागल्यानं ती कोमात गेली आहे. तिच्यावर सध्या कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर नीलमचे वडिल तानाजी शिंदे व मामा संजय कदम यांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार तथा सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली आणि इमर्जन्सी व्हिसासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यानुसार श्रीनिवास पाटील यांनी तातडीनं मेल करून परिस्थितीचे गांभीर्य परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी देखील खासदार सुप्रिया सुळे यांना मेल करून घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट परराष्ट्र मंत्री यांना ट्विट करून याबाबत माहिती दिली. यानंतर आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास निलमच्या कुटुंबियांना अमेरिकन दूतावासाचा फोन तसेच ईमेल आला आणि त्यांनी मुंबईत भेटीसाठी उद्या येण्याची विनंती केली.

आम्हाला व्हिसा मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्याबद्दल आभारी : संजय कदम

नीलमवर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिला भेटण्यासाठी आम्हाला व्हिसा मिळावा म्हणून वडिल तानाजी शिंदे यांना घेऊन केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार तथा सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली होती. त्यानंतर श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी तातडीनं मेल करून परिस्थितीचे गांभीर्य परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले तर सारंग पाटील यांनी देखील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मेल करून माहिती आली आणि माध्यमांनी केलेल्या प्रयत्नानंतर आज दुपारी आम्हाला अमेरिकन दूतावासाचा फोन व मेल आला. त्यांनी उद्या मुंबईत भेटीसाठी बोलवलं असल्याने आम्ही मुंबईला निघालो असल्याची प्रतिक्रिया नीलमचे मामा संजय कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

नीलमशी वडिल व मामांची लवकरच भेट होईल : माजी खासदार श्रीनिवास पाटील

उंब्रज येथील नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत भीषण अपघात झाल्यानंतर १५ रोजी नीलमच्या चुलत्यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आम्ही नीलम शिक्षण घेत असलेल्या युनिव्हर्सिटीतील डीनशी ईमेल करून संपर्क केला व माहिती घेतली. त्यानंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या ऑफिसशी संपर्क साधून विभूतीनाथ पांडे यांना ईमेल करून नीलमची मैत्रीण ख़ुशी व वडिलांचा संपर्क क्रमांक पाठवून त्यांच्याबाबत युनिव्हर्सिटी व मंत्र्यांच्या ऑफिसला माहिती दिली. तसेच सारंग पाटील यांनी देखील सुप्रिया सुळे यांना मेल करून माहिती आली होती. आज अमेरिकन दूतावासाने फोन तसेच मेल करून कुटुंबियांना उद्या शुक्रवारी भेटीसाठी मुंबईत बोलावले आहे. लवकरच नीलम आणि तिच्या कुटुंबीयांची भेट होईल, अशी प्रतिक्रिया माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.