कराडजवळ वाठार हद्दीत उड्डाणपुलावर 2 कारचा भीषण अपघात; पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत

0
2270
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार हद्दीत उड्डाणपुलावर क्रेटा गाडी आणि टाटा सफारी या दोन्ही गाड्यांचा डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर महामार्गावरील उडाणपुलावरून वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर हून पुण्याकडे पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी क्रमांक (KA 22MD 6021) ही निघालेली होती. तर काळ्या रंगाची सफारी (MH 04 LM 4001) मुंबई हून कोल्हापूरच्या दिशेने निघालेली होती. यावेळी दोन्ही गाड्या वाठार गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर आल्या असत्या काळ्या रंगाच्या गाडीने डिव्हायडरला जोरात धडक दिली. डिव्हायडरला धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला. याचवेळी धडक दिलेला डिव्हायडर बाजूला झाला असता त्याला कोल्हापूर हून पुण्याकडे पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडीने धडक दिली. धडक दिल्यानंतर गाडी पुढे जाऊन पलटी झाली. या अपघातानंतर पुलावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली.

या अपघाताची माहिती महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तसेच कदम क्रेनचे चालक सुनील कदम, वाहतूक पोलीस गणेश बाखले यांना अपघातस्थळी असलेल्या नागरिकांनी फोनवरून दिली. यावेळी महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तसेच क्रेन चालक कदम काही वेळेत अपघातस्थळी दाखल झाले. कदम यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.