सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील कूपर कॉलनी, सदर बझार येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा घरातील गॅलरीतून पडून मृत्यू झाला. ही घटना दि. १८ रोजी घडली होती, मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवार, दि. २४ रोजी त्याचा मृत्यू झाला. वरद पोपट चव्हाण असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वरद हा साताऱ्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरद चव्हाण दि. १८ रोजी सकाळी सहा वाजता अचानक गॅलरीतून खाली पडला आणि बेशुद्ध अवस्थेत घरातल्यांच्या निदर्शनास आला. त्याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुधीर मोरे यांनी घटनास्थळी पोहोचले.
वरद नेमका कसा पडला?, हे घरातल्यांनाही माहिती नसून या घटनेचा सातारा शहर पोलिसाकडून अधिक तपास केला जात आहे. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.