रस्ते विकास महामंडळाचे कराड ते कार्वे रस्त्याचे काम पाडले बंद; कार्वेसह परिसरातील शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा

0
1063
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कराड, वाखाण, कोरेगाव, कार्वे, कोडोली मार्गे महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामामध्ये कार्वेसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कार्वे येथे सुरु असलेले काम आज मंगळवारी सकाळी बंद पाडले. यावेळी संबंधित ठेकेदाराला चालू असलेल्या कामावर बोलवून सदरचे काम बेकायदेशीर व नियमबाह्य सुरू असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरु करून देणार नाही. जर काम सुरु केले तर तीव्र स्वरूपात आंदोलन करून पुन्हा काम बंद पाडू अशा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी कामाक्षी सोसायटीचे चेअरमन अनिल जाधव, शंकरराव जाधव, विजय जाधव, मोहन जाधव, सुहास पाटील, कृष्णराव पाटील, मोहन थोरात, अभिजीत जाधव, माजी पंचायत समिती सदस्य कैलास जाधव, संपतराव जाधव, प्रकाश जाधव, विश्वास थोरात, विश्वास पाटील, धोंडीराम थोरात, महेश जाधव, प्रमोद थोरात, राहुल थोरात, मुन्नाभाई मुल्ला, बाळासो थोरात, शेतकरी खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड, वाखाण, कोरेगाव, कार्वे, कोडोली हा सदरचा रस्ता हा कराडचे कृष्णा नाक्यापासून वाखण मार्गे कोरेगाव हद्दीतून कारवे गावातून कोडोली कृष्णा नदीवरील पाचवड फाट्यापर्यंत महामार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्यावरून विटा, कडेगाव, ओगलेवाडी तसेच मसूर, सैदापूर, पार्ले, बनवडी परिसरातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याकरिता मूळचा रस्ता अंदाजे २० फुटाचा असून वाढीव रस्ता म्हणून अधिक २० फूट असा रुंदीकरण रस्ता होणार आहे. या रस्त्यावरून दळणवळण वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. रुंदीकरणात मात्र, कार्वे येथील शेकडो शेतकऱ्यांची शेत जमीन रस्त्यामध्ये जाणार आहे.

अनेक शेतकरी अल्पभूधारक असून रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनीचा नुकसान भरपाई मोबदला मिळालाच पाहिजे. मात्र, याबाबत रस्ते विकास महामंडळ संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी खातेदारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याचे काम सुरू केले आहे.

शेत जमिनी गेल्यास प्रसंगी आंदोलन करू : विजय जाधव

कार्वे येथीलशेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रस्त्याचे सुरु असलेले काम बंद पाडले. कार्वे येथील सदरचा पाणी रस्ता हा शेती वाहतुकीसाठी आम्ही स्वतःच्या जमिनी देऊन सुरु केला आहे. त्या रस्त्यावर गतवर्षी डांबरीकरण करण्यात आले सध्या असणारा विस्तार वीस फुटापर्यंतचा आहे. तो रस्ता आम्हा शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पुरेसा आहे. मात्र, शासन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दहा अधिक दहा असा २० फुटाणे रस्ता वाढणार आहे. त्यामध्ये आमच्या जमिनी रस्त्यामध्ये जात आहे. तरी रस्त्याची काम पूर्णतः कायमचे थांबवा अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल अशी प्रतिक्रिया कार्वेतील शेतकरी विजय जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.