महाबळेश्वरात शिक्षण महोत्सवाचे सीईओ याशनी नागराजन यांच्या हस्ते उद्घाटन

0
26
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या वतीने २ दिवसीय शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे चौथे वर्ष असून आनंददायी वातावरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी उद्याचे भविष्य आशादायी आहे असे मत व्यक्त केले. यावेळी महोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यामध्ये पुस्तकांचे गाव भिलार, मधाचे गाव मांघर, शिवरायांचे बालपण, विविध साहित्यिक विषयांवर चित्ररथ होते. लेझीम पथक, झांज पथक आणि विविध वेशभूषा यामुळे दिंडी आकर्षक बनली होती. विद्यार्थी आणि शिक्षक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

यशवंत भांड, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, कवी भरत सुरसे यांनी मशाल प्रज्वलित करून ग्रंथदिंडीचा शुभारंभ केला. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बालसाहित्य संमेलन, कवीसंमेलन, शैक्षणिक परिसंवाद, व्याख्यान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश महोत्सवात आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षणाधिकारी प्राथ. शबनम मुजावर यांनी महाबळेश्वरसारख्या तालुक्यात शिक्षण महोत्सव आयोजित करणे हे महाराष्ट्रसाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार काढले. शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यक आहेत आणि शिक्षण महोत्सवासारखे उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे मत पूर्व सभापती संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

यावेळी कवी साहित्यिक भरत सुरसे, सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव कांबळे, प्रवीण शेठ भिलारे, तेजस्विनी भिलारे, धोंडीबा जंगम, सुभाष कदम, रमेश शेठ चोरमले, एम.के. वाशिवले, एन.के. गायकवाड, पा.ना. कारंडे गुरुजी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरुषोत्तम माने, संजय सकपाळ आणि प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. अमित कारंडे यांनी आभार मानले.