सातारा प्रतिनिधी | राज्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात कोकण महसूल विभागातील खनिकर्म विभागाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी खाणपट्ट्यांमधून खनिजाची वाहतूक करताना अनेक वाहनांवर आवरण नसते. त्यामुळे धूळ उडून प्रदूषण होते. शिवाय अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करून खाणीचे परवाने तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश ना. शंभूराज देसाई यांनी दिले.
मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीस या बैठकीला खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, महासंचालक डॉ. जी. डी. कांबळे, उपसंचालक रोशन मेश्राम व कोकण विभागातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी उपस्थित होते.
खाणींमधून खनिज तसेच गौण खनिजाची होणारी चोरी रोखण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे एक नियंत्रण जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याच्या मोबाइलवर ठेवावे. तसेच राज्यभरातील खनिकर्म विभागाची यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या.