कराड प्रतिनिधी । शॉर्ट सर्किटमुळे 11000 वोल्टच्या मेन एक्स्टेंशन लाईनला भीषण आग लागून यामध्ये घरावरील विद्युत साहित्य जळून खाक झाल्याची घटना कराड तालुक्यातील शेणोली येथे रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये घरात झोपलेल्या १५ जणांचा जीव थोडक्यात बचावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेणोली गावात शहानवाज मुल्ला हे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी रात्री तर आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. यावेळी रात्री 1 वाजवाजण्याच्या सुमारास लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. घराशेजारील नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील मुल्ला यांच्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सदरची माहिती वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
माहिती मिळताच कर्मचारी विशाल विजय गायकवाड व समीर मुल्ला, पोलीस पेट्रोलिंग करणारे कर्मचारी खाडे व इतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी धाडसाने मुख्य लाईट बंद केली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
गेल्या काही दिवसांपासून वीज वितरणा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या दुर्घटनांनी शेणोलीतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या संदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.