अजिंक्यतारा किल्ला परिसरात वणवा; हजारो वनसंपदा आगीमध्ये होरपळली

0
283
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या डोगर परिसरात वनवा लावण्याच्या घटना घडत आहरेत. या ठिकाणी वनव्यामध्ये हजारो औषधी तसेच इतर वृक्ष, वनस्पती जाळून नष्ट होत आहेत. दरम्यान साताऱ्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा परिसरातील वृक्ष संपदा रविवारी अज्ञाताने लावलेल्या वणव्यामध्ये होरपळून गेली. मंगळाईदेवी मंदिर परिसरातील आणि डोंगर उतारावरील शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वन विभागाने जाळ रेषा निर्धारित करण्याची वेळीच गरज असून नागरिकांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर परिसरातील तण जाळून टाकण्यासाठी वणवे लावले जातात. मात्र, त्याकरिता नियंत्रित पद्धतीचा जाळ करून जमिनीला तणापासून वाचवणे महत्त्वाचे सांगितले जाते. हे जाळ मर्यादित न राहिल्याने त्यामुळे वृक्षसंपदा होरपळत आहे. असेच काहीसे चित्र रविवारी अजिंक्यतारा किल्ला परिसराच्या डोंगर उतारावर दिसत होते. येथे पिंपळ, चंदन, लिंब अशी विपुल वृक्षसंपदा आहे. अजिंक्यतारा किल्ले परिसराच्या पायथ्याला असलेल्या मंगळाईदेवी मंदिर परिसरात पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या वृक्षसंपदेला वणव्याची झळ बसली.

काही हेक्टर परिसरातील शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच मोरांपासून बिबट्यापर्यंत सर्व प्रकारच्या प्राणीपक्ष्यांचाही किल्ल्याच्या परिसरात वावर आहे. वणव्यामुळे या पक्षीप्राण्यांनाही मोठी झळ बसते. सातारा शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून अजिंक्यतारा किल्ल्यावर लागलेला वणवा आणि त्यामुळे उठणारे धुराचे लोट हे चित्र दुरवरुन दिसत होते. वनविभागाने वणवा नियंत्रित जाळ रेषा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, हा विषय वन विभाग कधीही गांभीर्याने घेत नाही. परिणामी त्याचा फटका येथील पर्यावरणाला बसत आहे. मंगळाई देवी परिसरापासून काही अंतरावर निवासी क्षेत्र आहे. वणव्याची आग डोंगर उताराच्या खालच्या भागापर्यंत पसरली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे. सातारा नगरपालिकेने त्यांच्या येथील कार्यक्षेत्रातील भाग म्हणून या प्रकरणी हस्तक्षेप करून वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून केली जात आहे