सातारा प्रतिनिधी | कोरेगाव शहरात वाढत असलेल्या अनधिकृत अतिक्रमांवर नागरपंचायतीकडून कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. नगरपंचायतीने गेल्या दोन दिवसात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुमारे 35 अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे शहातील सुभाष नगर, मॉडर्न हायस्कूल, साखळी पुल व जुना मोटर स्टँड परिसरातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
मागील अडीच महिन्यांपासून शहरातील वाहतूक कोंडी व त्यातून होणार्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संयुक्तपणे शहरातून जाणार्या सातारा ते लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडली होती. प्रथम त्यांनी रस्त्याकडेला अस्ताव्यस्त व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी फेरीवाले, फळे, भाजीपाला, इतर छोटे मोठे साहित्य विक्रेते, दुकानदारांनी आपापल्या दुकानाच्या समोर जाहिरात फलक, पत्र्याचे छत आदी माध्यमातून केलेली कच्ची अतिक्रमणे हटवली. त्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये 96 पक्क्या अतिक्रमण धारकांना रीतसर नोटीसा काढून त्यांना अतिक्रमणे काढून घेण्याचे सुचित केले.
मात्र, त्यास फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात दुसर्या वेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात आली. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी विनोद झळक यांनी दोन दिवस पोनि घनश्याम बल्लाळ, सपोनि दिपाली मुसळे पोलीस जवानांच्या उपस्थितीत सुभाष नगर हाउसिंग सोसायटी ओपन स्पेस मध्ये स्थायी स्वरूपात उभे केलेली 4 पत्रा शेड, मॉडर्न हायस्कूल जवळील सहा, साखळी पुन्हा नजीक 6, व जुना मोटर स्टँड परिसरात 10 व पक्के बांधकाम केलेली 1 अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आली.