सातारा प्रतिनिधी | आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे किंवा दुप्पट रकमेचे सोेने मिळेल, असे अमिष दाखवून 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. राजगुरुनगर, सध्या रा. संगमनगर खेड) व प्रतिक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनुराधा विशाल लोहार (वय 27, रा. अंबेवाडी, ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 21 ऑगस्ट 2024 ते 3 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ही घटना सातार्यातील खंडोबा मंदिराशेजारी असलेल्या स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. येथे घडली आहे. संशयितांनी तक्रारदार लोहार यांना स्कीमचे अमिष दाखवून तसेच 10 हजार रुपयांत 3 ग्रॅम सोन्याचा क्वॉईन अथवा 20 हजार रुपये परतावा (कालावधी 55 दिवस), ठेव म्हणून ठेवलेल्या पैशांवर 5 टक्के कॅशबॅक अशा विविध स्कीमचे अमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांच्यासह इतरांनाही ही स्कीम सांगून 9 लाख 10 हजार रुपये घेतले.
मात्र, त्याचा काहीच परतावा व रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याने अखेर तक्रारदार यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, याच प्रकरणातील संशयित धन्यकुमार माने तसेच शरयू माने यांना आमच्या पैशांचे काय झाले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरुन त्यांनी तू कोण आम्हाला विचारणारी, असे म्हणत जमिनीवर पाडून दगड मारुन तसेच चावा घेऊन जखमी केल्याप्रकरणी व मैत्रिणींना शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. अनुराधा लोहार यांनी याबाबत तक्रार दिली. ही घटना दि. 20 रोजी बीएसएनएलच्या सातारा कार्यालयामागे घडली आहे