सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरणीय द़ृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कांदाट खोऱ्यातील अहिर परिसरात ठेकेदारांनी विनापरवाना खाणी पाडून अमर्याद गौण खनिज उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. या ठेकेदारांनी वृक्षतोड करून पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भागातील वन्यजीवांना धोका निर्माण केल्याने संंबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत घालून त्यांच्यावर त्या-त्या बेकायदा कृत्याबद्दल गुन्हे दाखल करावेत. बेकायदा उत्खनन झालेल्या जमिनीच्या मूळ मालकांवर उचित कारवाई करावी. अन्यथा 6 मार्च रोजी महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार, असा इशारा दिला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी सुशांत मोरे यांनी दिली आहे.
सुशांत मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अहिर (ता. महाबळेश्वर) परिसरात अनधिकृत खाणींचा सुळसुळाट झाला आहे. ठेकेदारासह महसूल विभाग, वन विभाग, वन्यजीव विभागाच्या झालेल्या अभद्र युतीमुळे पश्चिम घाटाची जैवविविधता धोक्यात आली असून संबंधित अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत.
अहिर (ता. महाबळेश्वर) येथे अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश वाई प्रांताधिकार्यांना दिले आहेत. संबंधित ठेकेदारांनी लाखो ब्रास मुरुम, खडी, डबर, क्रश सँड काढल्याचे दिसून येत आहे. वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी अहिर परिसरात झालेल्या उत्खननाचे सविस्तर पंचनामे करावेत. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करु नये. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार वाई प्रांतांनी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. महसूल विभागाच्या या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ठेकेदारांनी केलेले बेकायदा उत्खनन व वाहतूक, अनधिकृत खाणी तयार करणे, बेकायदा वृक्षांची कत्तल करणे, वन्यजीवांना धोका पोहोचवणे, पर्यावरणाची हानी करणे अशा बर्याच चुकीच्या बाबी ठेकेदारांकडून झाल्या आहेत. कांदाटी खोर्यात मनमानी करणार्या ठेकेदारांच्या मुसक्या आवळाव्यात. महसूल, वन व वन्यजीवन विभागाने संबंधित ठेकेदारांवर त्या-त्या बेकायदा कृत्याबद्दल स्वतंत्र गुन्हे दाखल करावेतच पण दंडही वसूल करावा. ठेकेदारांना काळ्या यादीत घालावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.
ठेकेदारांसह मूळ मालकांवरही कारवाई करावी : सुशांत मोरे
महाबळेश्वर तालुक्यातील अहिरमधील बेकायदा उत्खनन झालेली जमीन वतनाची आहे. शासनाने अटी शर्तीवर संबंधित मालकांना ती शेती करण्यासाठी दिली आहे. मात्र, त्या जमिनीत बेकायदा उत्खनन झाल्याने ठेकेदारांसह मूळ मालकांवरही कारवाई झाली पाहिजे. अन्यथा 6 मार्चला आत्मक्लेश आंदोलन करणार, असा इशारा दिला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.