सातारा प्रतिनिधी | सध्या फेब्रुवारीतच उन्हाच्या तीव्र झळा सोसून लागल्या आहेत. उन्हाळ्यास सुरुवात झाल्याने बाजारात थंडगार लिंबू सरबत, कलिंगड देखील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अशात सातारा जिल्ह्यात तीव्र उन्हामुळे धरण तसेच विहिरींमध्ये पाणीपातळी खालावली आहे. परिणामी पिकांना पाणी देणे मुश्किलीचे बनले आहे. माण तालुक्यातील सहा गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकर सुरू झाले आहेत. या टॅंकरवर १० हजारांहून अधिक लोकांची तहान अवलंबून आहे. माण तालुक्यात ६ गावे टंचाईग्रस्त आहेत. त्या अंतर्गत ६७ वाड्यांना ही टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले होते. पण, माण तालुक्यातील काही भागात पाऊस कमी झाला होता. यामुळे पाऊस कमी झालेल्या भागात टॅंकर यंदा लवकर सुरू करावे लागतील असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कारण, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत.
माण तालुक्यात यंदा लवकर टंचाई परिस्थिती उद्भवलीय. मागील चार दिवसांपासून माणमधील सहा गावांना आणि वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या गावांना सध्या टॅंकर सुरू आहेत. माणमधील आणखीही काही गावांनी टॅंकरची मागणी केलेली आहे. त्यामुळे माण तालुक्यात टॅंकरची संख्या वाढणार आहे.