सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या (SSC Exam 2025) परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. सातारा जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर ३८ हजार ४९७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आजपासून जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली.
दहावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले असून, ४० हून अधिक भरारी पथकांची नेमणूक केली आहे. दहावीची परीक्षा आजपासून सुरूवात झाली असून दि. १७ मार्चदरम्यान परीक्षा होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
सातारा जिल्ह्यात ७७१ शाळा व विद्यालये असून, १५ ठिकाणी परीरक्षक केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांसह महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांचाही भरारी पथके नियुक्त केली आहेत. संवेदनशील जिल्ह्यातील कोणत्याही दहावीच्या परीक्षा केंद्रात कॉपी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
परीक्षा पारदर्शक होण्यासाठी संवेदनशील केंद्राचे ड्रोनमार्फत चित्रीकरण, भरारी पथके यासह इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचबरोबर परीक्षा केंद्रात गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय दर वर्षीप्रमाणे परीक्षा केंद्रातील ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची महिती प्रशासनाने दिली आहे.