खानापूरातील शेतकऱ्याने 20 गुंठ्यात पिकवलं 15 क्विंटल पिवळं सोनं; विक्रमी सेंद्रीय हळदीचे उत्पादन

0
559
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ऊसाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी हळदीचे उत्पादन घेतो. यंदा शेतकऱ्यांसाठी चांगले सुगीचे दिवस आले आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात प्रामुख्याने हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर, कोरेगावचा पश्चिम व जावळी तालुक्याच्या पूर्व भाग हळदीचे पीक घेण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. सद्यस्थितीत वाई तालुक्यात शेत शिवारामध्ये हळदीची काढणी सुरू असून प्रक्रिया करण्याचे कामसुद्धा सुरू आहे. अशात सेंद्रिय शेती काळाची गरज ओळखून वाई तालुक्यातील खानापूरमधील सेवानिवृत्त माजी सैनिक तथा प्रयोगशील शेतकरी संतोष जाधव यांनी २० गुंठ्यात हळद पीक लागवड करून त्यातून १५ क्विंटल इतके उत्पादन घेतले आहे.

वाई तालुक्यातील खानापुरातील संतोष जाधव यांनी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावाकडे वडिलोपार्जित असलेली शेती करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षांपासून त्यांनी खानापूर येथे ऊस तसेच हळदीचे पीक घेण्यास सुरुवात केली. खानापुरातील पाच एकर शेतीपैकी २० गुंठे क्षेत्रात जाधव यांनी यंदाच्या वर्षी हळदीचे चांगले उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे जाधव यांनी गेल्या वर्षी हळदीची लागवड करत चांगला दर मिळवला होता. त्यांच्या हळदीला १७ हजार रुपये प्रति किंटल दर मिळाला होता.

शेतकरी जाधव यांनी 20 गुंठ्यात 15 क्विंटल हळदीचे उत्पन्न घेतले असून त्यांना लागणीपासून ते काढणीपर्यंत सुमारे लाख रुपये इतका खर्च आला आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगले हळदीचे उत्पादन घेता येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणारे आवश्यक असल्याचे जाधव सांगतात. त्यांनी घेतलेल्या हळदीच्या उत्पादनाची वाई तालुक्यात सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे.

खानापुरातील शेतकरी संतोष जाधव यांनी विक्रमी उत्पादन काढल्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. निरोगी आरोग्यासाठी ही चळवळ काळाची गरज आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे.

जाधवांच्या हळदीची पावडर लोणावळ्यातील हॉटेलात

वाई तालुक्यातील खानापुरातील संतोष जाधव हे गेल्या व वर्षांपासून शेतात पिकवलेल्या हळदीची पावडर हे वर्षभर विविध हॉटेलला पुरवतात. सेंद्रिय पद्धतीने हळदीचे पीक घेत असल्याने त्यांच्या हळदीत चांगले आयुर्वेदिक गुणधर्म तसेच चव देखील असल्याने त्यांची हळद ही लोणावळ्यातील हॉटेलचालक आवर्जून मागून घेतात.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन घ्यावे : संतोष जाधव

गेल्या वर्षीदेखील हळदीचे चांगले उत्पादन घेतले होते. यावर्षी देखील २० गुंठ्यात १५ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा खर्च वाढत आहे. रासायनिक खतामुळे उत्पादित शेतमालापासून आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होत. यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी, असे आवाहन करत असल्याची प्रतिक्रिया हळद उत्पादक शेतकरी संतोष जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

अशी केली जाते हळदीवर प्रक्रिया

शेतकरी शेतात जमिनीची उपलब्धता आणि भांडवल याचा मेळ घालून हळदीची लागवड करत असतो. साधारणतः एक एकरापासून ही लागवड केलेली दिसून येते. त्यामध्ये हळदीचे एकरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकरी उत्पादन घेत असतो. काही ठिकाणी शेतकरी स्वतः अथवा मजुरांच्या मदतीने काढणी योग्य हळद पीक उकरून काढले जाते. त्यानंतर हळद बॉयलरमध्ये शिजवली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती उन्हामध्ये वाळवली जाते. मग चांगली हळद, सौरे गड्डा, अंगठे गड्डा, कुणी व गड्डा अशा पाच प्रकारात प्रतवारी करून विक्रीसाठी उपलब्ध होते.

स्वयंपाकापासून ते आयुर्वेदिक उपचार

घरात स्वयंपाकापासून ते आयुर्वेदिक उपचार म्हणूनही हळदीचा उपयोग होतो. त्यामुळे बाजारात हळदीला मोठी मागणी असते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. तर देशातील अन्य राज्यांतही हळदीची शेती केली जाते. हळदीची शेती साधारण मार्च सुमारास सुरु केली जाते. या दरम्यान लागवड आदी कामे केली जातात.सद्यस्थितीत अनेक शेतकरी हळदीच्या शेती आधुनिक तंत्र वापरून करत आहेत. कमीत कमी खर्च करून अधिकचे उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने अनेक शेतकरी हळद शेतीला देखील प्राधान्य देशातील अनेक भागात शेतकरी देत आहेत.