सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती सातारा राजधानीच्या वतीने तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाहू कलामंदिर येथील शिवसाहित्य संमेलनाच्या समारोपास सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे सरदार, शिलेदार यांचा आपल्याला माहीत नसलेला इतिहास समाजापुढे आला पाहिजे. खरा इतिहास प्रत्येकाला समजला पाहिजे, या उद्देशाने आपण एक दिवसाचे शिवसाहित्य संमेलन साताऱ्यात भरवले. केवळ आजच नव्हे, तर छत्रपतींच्या इतिहासाला सातत्याने उजाळा मिळण्यासाठी शिवसाहित्य संमेलन दर वर्षी घेतले जाईल, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणेचे विश्वस्त विनीत कुबेर, अमोल मोहिते, मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ॲड. नितीन शिंगटे, अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, एकदिवसीय शिवसाहित्य संमेलनात पहिल्या सत्रात सौरभ कर्डे यांनी ‘छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार,’ शैलेश वरखडे यांनी ‘थोरली मसलत’ यावर व्याख्यान दिले. पियुषा भोसले व सहकलाकारांनी ‘शिवशाहिरांचे पोवाडे’ सादर केले. मोहन शेटे यांनी ‘छत्रपतींची युद्धनीती’ आणि प्रा. प्र. के. घाणेकर यांनी ‘छत्रपतींचे दुर्गवैभव’ यावर सविस्तर माहिती दिली. समारोप्रसंगी अफजलखान वध (१६४५ ते १६५९) ‘गोष्ट इथे संपत नाही’ या सारंग मांडके व सारंग भोईरकर यांचा कार्यक्रम झाला.