सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त सातारा येथे आयोजित करण्यात आलेली जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात पार पडली. गांधी मैदान राजवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व पदयात्रेची सुरुवात केली.
यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सातारा शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत. शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची गैर सोय होणार नाही यासाठी प्रशासन व पोलीस प्रशासन कटीबद्ध आहे.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी यासह विविध घोषणाबरोबर तुतारींच्या, हलगीच्या निदनात पदयात्रा जिल्हा क्रीडा संकुल येथे सांगता झाली. क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत, ज्येष्ठ नागरिक यांच्या सहभागाने योगसत्रही संपन्न झाले.

छत्रपती शिवरायांचे जीवन,चरित्र आजही दिशादर्शक : जिल्हाधिकारी
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, समाजातील सर्व घटक सन्माने जीवन जगत आहेत याचा आधार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्यांनी दिलेला विचार हे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आज देशवासीय जीवन मार्गक्रमन करीत आहेत. जीवनातील कठीण प्रसंगाला कसे सामोरे जावे किंवा अपुऱ्या साधनांसह जीवनात अनेक प्रसंगाचे नियोजन कसे करावे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले स्वराज्य आणि कार्य आहे. त्यांचे जीवन आणि चरित्र आजही आपल्या सर्वांना दिशादर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले अशा महामानवांच्या जीवनाकडे पाहिल्यास कोणालाही निराशेला सामोरे जावे लागणार नाही. त्यांचे विचार, कार्य सतत आपल्याला दिशा दर्शक आहेत.

सातारा शहर झाले शिवमय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रशासनामार्फत जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रे निमित्त सातारा शहर शिवमय झाले. सातारा शहर ठिक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौका चौकात शिवकालीन खेळांचे प्रदर्शन करण्यात आले हे खेळ उपस्थितांचे आकर्षण ठरले. तसेच या पदयात्रेत लेझींम पथक, झांज पथक, सांस्कृतिक कार्यक्रम, घोडेस्वार, पोतराज, मावळ्यांच्या वेशात मुलांनी हजारोंच्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता.

पदयात्रेत आरोग्याचाही जागर
जय शिवाजी जय भारत पदयात्रेत आरोग्य विभागाकडून आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. गांधी मैदान येथे एचआयव्ही आजाराबाबत कलापथाकच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच जीबीएस आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. या विषयही आरोग्य विभागाकडून पदयात्रे जनजागृती करण्यात आली.