कराड प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. तर परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील एसटी आगारामध्ये स्वच्छता राखावी, प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जाऊ लागू नये यासाठी अनोखी स्पर्धा घेतली जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ स्पर्धा आयोजित केली होती. यानंतर आता पुन्हा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये यश मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील विभागातील आगारांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण म्हणून गणले जाते. याठिकाणी दररोज हजारो प्रवासी येत असतात. त्यामुळे येथील स्वच्छता राखणे मोठ्या जिकरीचे होऊन बसते. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता येण्यासाठी एसटी महामंडळाने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्याला प्रतिसादही मिळत आहे.
लोकसहभागातून कामे
एसटी महामंडळाने सुरू केलेली बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर कामे केली होती. त्यामुळे महामंडळाला कसलाही 3 खर्च आला नाही. मात्र, वातावरण प्रसन्न होण्यास मदत नक्कीच झाली आहे.
वर्षभर राबविले जाणार स्वच्छ बसस्थानक अभियान
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ हे अभियान वर्षभर राबविले जाणार आहे. या अभियानात केलेल्या कामाचे वरिष्ठ पातळीवरून नेमलेल्या समितीकडून मूल्यमापन केले जाणार आहे. ही समिती एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणार आहे. त्यानंतर या स्पर्धेचा निकाल लागून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
नियमित स्वच्छतेवर भर
एसटी महामंडळाचा परिसर, प्रवासी प्रतीक्षालय, इमारती, स्वच्छतागृह यांची नियमित स्वच्छता ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये संबंधित समिती बसस्थानकात किती स्वच्छता ठेवली आहे, याचे परीक्षण करणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना बसस्थानक हे एक घर वाटले पाहिजे अन् सर्वसामान्यांचा एसटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
प्रत्यक्ष समिती देते स्थानकास भेट
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ हे अभियानमध्ये सातारा जिल्ह्यतील जे जे बसस्थानक सहभाग घेतात. त्या बसस्थानकातीळ कामाचे वरिष्ठ पातळीवरून नेमलेल्या समितीकडून भेट देऊन मूल्यमापन केले जाते. यावेळी समितीतील सदस्यांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते आणि कामांचा आढावा घेत सुधारण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या जातात.