महाबळेश्र्वर परिसरात 2 वर्षातून एकदा फुलणार्‍या अंजन वनस्पतीला आलाय बहर

0
382
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री पर्वत रांगा परिसरात अनेक दुर्मिळ अशा वनस्पती आहेत. त्यातील एक अंजन वनस्पती ही दर दोन वर्षांतून एकदा फुलते. ही वनस्पती महाबळेश्र्वर परिसरात आढळत असून अंजन या वनस्पतीला महाबळेश्वर परिसरात बहर आला आहे.

या वनस्पतीमुळे परिसरातील जंगले अंजन फुलांच्या निळ्या जांभळ्या रंगानी नटलेले असल्याचे सुखद चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे निसर्ग सौंदर्याची अनोखी छटा दिसत असून यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. ही फुले पर्यटकांच्याही पसंतीस पडत आहेत.

फुले व फुलोर्‍याच्या काळ म्हंटले की परागी वहनासाठी व त्याच बरोबर फुलांतील मधुर गोड व औषधी मध गोळा करण्यासाठी ही मध माश्यांचे या फुलां भोवती लगबग चालू असते. असेच काहीसे चित्र सध्या येथील पठारावर जंगलात पहावयास मिळत आहे. सध्या महाबळेश्वरचे हे पठार दर दोन वर्षांनी फुलणार्‍या अंजनीच्या फुलांनी बहरले आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता असो वा विविध पर्यटन स्थळांकडे जाणारा रस्ता व जंगल असो सर्व पठारावर आंजनीच्या फुलांना बहर आला आहे.

या फुलांच्या निळसर जांभळ्या रंगाच्या झुपकेदार फुलांमुळे निसर्ग प्रेमी वेडा होत आहे. तर मध माशांचे त्यातील मध गोळा करण्यासाठी फुलांभोवती पिंगा सुरू आल्याचे मोहक दृश्य ही पाहिला मिळत आहे. दर दोन वर्षांनी फुलणार्‍या अंजन वनस्पतीचे वनस्पती शास्त्रातील नाव मेमेसिलोन अंम्बेलॅटम असे असून त्याची वनस्पती शास्त्रातील फॅमिली मेलास्त्रोमासीई ही आहे. सर्व साधारणपणे फेब्रुवारी, मार्च या कालावधीत निसर्गाचा हा फुलोरा पहावयास मिळत असतो.अंजनीच्या झाडाच्या फांदीवर या फुलांच्या माळा लगटलेल्या दिसत असून ते पाहताना मनाला मोह पडला नाही तरच नवल. अंजन जातीची वनस्पती फुलांच्या झुपकेदार निळसर जांभळ्या रंगाच्या वेण्या घालून नटलेली दिसते.