सातारा प्रतिनिधी । सध्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून काही वेळा विद्यार्थ्यांना वेळेवर पोचणे अवघड होते. त्यांना ट्रॅफिक जाम आणि वाहने न मिळाल्याने उशिरा परीक्षा केंद्रावर जावे लागते. मात्र, यावेळी काहीजण अनेक शक्कल लढवतात. अशाच प्रसंग एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर आला. त्यावेळी त्याने थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठलं आणि पेपर दिला. परीक्षेला उशीर होईल म्हणून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठल्याचा आश्चर्यजनक प्रकार सातारा जिल्ह्यातील आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरध्ये घडला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढल्याने याचा नाहक त्रास महाविद्यालयीन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोय. पर्यटकांच्या गाड्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्यांना परीक्षांचे पेपर देण्यासाठी जाताना वाहतूक कोंडीचा समान करावा लागतोय. पर्यटकांची झालेली गर्दी, त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर पाहून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडींगने परीक्षा केंद्र गाठले. घाटातून कारने प्रवास करायला वेळ लागेल म्हणून विद्यार्थ्याने हा निर्णय घेतला.
समर्थ महांगडेच्या संदर्भातील चर्चा ऐकून पाचगणी येथील गोविंद येवले यांनी त्याला पॅराग्लायडिंगद्वारे परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याची तयारी दाखवली. सुरुवातीला तो घाबरला. मात्र, गरज ओळखून त्यानं मनाची तयारी केली. गोविंद येवले यांनी प्रशिक्षित पॅराग्लायडर्ससोबत समर्थला कॉलेजच्या परिसरातील मैदानावर उतरवलं. मित्र कपडे, बॅग घेऊन आला आणि समर्थ पाच मिनिटं आधी परीक्षेला पोहोचला. “गोविंद येवले यांच्यामुळं मी परीक्षेला वेळेत पोहचू शकलो,” असं म्हणत समर्थनं त्यांचे आभार मानले.
समर्थ महांगडे हा पॅराग्लायडिंग करत परीक्षेला जात असलेला व्हिडिओ सोशल माध्यमांवर पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून महाबळेश्वरमधील हॅरिसन फॉली पॉइंट येथून पसारनी घाट सेक्शन पर्यंत या विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगाने प्रवास करत परीक्षा केंद्र गाठलं. महाबळेश्वरमधील घाटात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा एकदा ह्या पॅराग्लायडींगच्या घटनेमुळे समोर आला आहे. विकेंड आणि वर्षाअखेर व सुट्ट्यांच्या हंगामात या घाटावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते. परीक्षा देणारा हा विद्यार्थी बी.कॉम प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो हॅरिसन फॉली पॉइंटवर स्वत:चं ऊसाच्या रसाचं दुकान आणि ज्युस सेंटर चालवतो. महाबळेश्वरमधील पाचगणीपासून 5 किमी अंतरावर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.