एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांनो कुटुंबासह आता 4 महिने करा फुकट प्रवास; कराडात ‘इतक्या’ जणांनी केलेत अर्ज

0
767
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव

नवीन वर्षामध्ये राज्य परिवहन महामंडळाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये तिकीट दरात १५ टक्के वाढ व दुसरा निर्णय म्हणजे एसटीच्या चालक-वाहकांना आता कुटुंबीयांसह चार महिने मोफत प्रवासाची सवलत लागू केली आहे. चार महिने मोफत प्रवासी सवलतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या योजने अंतर्गत कराड बसस्थानक आगारात आतापर्यंत 10 चालक-वाहकांनी मोफत प्रवासासाठी अर्ज दाखल केले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून मोफत प्रवासाची सवलत मिळावी, यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. एसटी महामंडळाने मागणी मान्य केली असली तरी केवळ चार महिनेच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर असे मोफत प्रवास सवलतीचे दोन टप्पे निश्चित केले आहेत. कमी पगारात काम करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोफत सवलतीमुळे देवदर्शन किंवा पर्यटन कुटुंबासह करणे सुलभ होणार आहे. परंतु, या सवलतीचा लाभ राज्यांतर्गत एसटीच्या साध्या किंवा निमआराम बससाठीच लागू असणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चालक आणि वाचकांसाठी कुटुंबासह मोफत प्रवास हा चार महिने करण्याचा घेतलेला निर्णय हा चांगला आहे. ऐनवेळी चालक आणि वाहकांना आपल्या कुटुंबासोबत एसटीतून लांबच्या ठिकाणी जाता येत नाही. त्यांना आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देखील येता येत नाही. मात्र, आता चालक वाहकांना आपल्या कुटुंबासोबत महाराष्ट्र्भर फिरता येता येणार असल्याची प्रतिक्रिया कराड बसस्थानक आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

दोन सत्रांसाठी मिळतो फॅमिली पास

राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली मोफत चार महिने प्रवासासाठीची योजना ही दोन सत्रात निश्चित केली आहेत. या वर्षातील केवळ दोन सत्रातच चालक आणि वाहकांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

ही सुविधा फक्त कर्मचाऱ्यांसाठी

वाहक-चालकांच्या कुटुंबीयांसाठी चार महिने मोफत प्रवासी सवलत सुविधा उपलब्ध केली आहे. चालक-वाहकांना पती-पत्नी, मुले, आई-वडील, सासू-सासरे यांच्यासमवेत मोफत प्रवास करता येणार आहे.

आता वर्षभरात ४ महिने मोफत फॅमिली पास

राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांकडून वर्षभरासाठी मोफत प्रवासी सवलतीची मागणी करण्यात आलेली होती. मात्र, वर्षभरात चार महिन्यांसाठी मोफत प्रवासाचा फॅमिली पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोफत प्रवासाबाबत अटी-शर्ती काय?

एसटीच्या साध्या, निमआराम बसमधूनच प्रवास करता येईल. आरामदायी, वातानुकूलित बसमधून प्रवास करताना तिकीट दरातील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे.

पहिले सत्र : जानेवारी ते जून

२ महिने मोफत प्रवास : महामंडळाने जानेवारी ते जून असे मोफत प्रवासासाठी पहिले सत्र निश्चित केले आहे. मात्र, सलग चार महिन्यांऐवजी दोन सत्रांतील दोन-दोन महिन्यांची निवड करता येणार आहे.

दुसरे सत्र : जुलै ते डिसेंबर

२ महिने मोफत प्रवास : दुसरे सत्र जुलै ते डिसेंबर आहे. त्यामुळे या सत्रातील सलग चार किंवा दोन महिन्यांची निवड करता येईल. कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद घेण्यासाठी त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना पर्यटन, देवदर्शनही करता येईल.