कराड प्रतिनिधी | मलकापूर येथील पालिकेने घरपट्टीसह थकीत कराच्या वसुलीसाठी कर विभागाने थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आजपर्यंत ३५ थकबाकीदारांची नळ कनेक्शन ही बंद केली आहेत.
यावेळी पथक प्रमुख दीपक गावडे, तेजस शिंदे, मनोहर पालकर, दादा शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. विभागाच्यावतीने पालिकेची एकूण एकत्रित मालमत्ता कर मागणी सात कोटी आहे. थकीत कर वसुलीसाठी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. करवसुलीसाठी नगरपालिकेमार्फत चार पथके तयार करण्यात आली आहेत. विभाग प्रमुखाची या पथकांचे पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये दहा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी थकबाकीदारांना थकबाकी भरण्याबाबत अनेक वेळेला आवाहन केले होते. मात्र, अनेक मिळकतधारकांनी आपला थकीत कर भरला नाही. तसेच अनेक मिळकतदारांनी चालू घरपट्टीही भरलेली नाही.
जे मिळकतदार थकीत आहेत, त्यांच्या मिळकतींवर कारवाई करणे, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावे पालिका कार्यक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी प्रसिद्ध करणे, मालमत्ता सील करणे, मालमत्ता अटकाव ठेवणे, लिलाव करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्याची प्रक्रिया पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई ३१ मार्चअखेर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार शहरातील ३५ थकबाकीदारांची नळ कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. पालिकेने थकबाकीदारांवर कारवाई चालू केल्यापासून एक जानेवारी २५ पासून आजअखेरपर्यंत १ कोटी ५ लाख एवढ्या मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मालमत्ताधारकांनी थकीत कर भरून पालिकेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.