सातारा जिल्ह्यात पारा वाढला; नागरिकांना करावा लागतोय उन्हाच्या झळांसह उकाड्याचा सामना

0
149
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हानंतर सूर्याची भीषण उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. वाढलेल्या उष्णतेत काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. जिल्ह्यातील दुपारचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत प्रमुख शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासूनचं उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा 40 अंशावर जात असल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांसह उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

राज्यात वाढत्या तापमानामध्ये शुक्रवारी १४ तारखेला महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाली आहे. दोन्ही ठिकाणचे तापमान ४० अंशावर पोहोचल्याचे बघायला मिळाले. तर पुण्यात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा 35 ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. भारतात फेब्रुवारी महिन्यांपासून उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट कायम होती. मात्र आता हळूहळू हवामान बदलायला सुरुवात झाली असून सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांतील तापमानाने आता 40 अंश सेल्सिअसच्या दिशेनं प्रवास करायला सुरुवात केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असून दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भाग दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पारा वाढलेला आहे. कमाल तापमान ४१ अंशापर्यंत पोहचले आहे. यामुळे नागरिकांना घरात बसण्याची वेळ आली आहे. तर शेतकरी सकाळच्या सुमारास शेतातील कामे उरकून घाईत आहेत. वाढलेला उकाडा, त्यातून निर्माण होणारे आजारामुळे नागरिकांचे लाही लाही होत आहे. वाढलेल्या तापमानाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

कोणत्या ठिकाणी किती तापमानाची नोंद?

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ केएस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साताऱ्यात 34.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सांगलीत 35.4, रत्नागिरीत 37.2, सोलापूर 36.4, मुंबई (सांताक्रूझ) 36.7, कोल्हापूर 34, पुणे 34.5 आणि ठाण्यात 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यापर्यंत या ठिकाणांचं तापमान सामान्य होतं. मात्र मागच्या आठवडा भरात या जिल्ह्यातील तापमान एक ते दीड अंशाने वाढताना दिसत आहे.

उष्माघात झाल्यास काय करावे…

उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे. शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. त्यानंतर त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.