फलटणला माजी खासदार अन् आमदारांच्या उपस्थितीत नवीन बसेसचे लोकार्पण

0
576
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण आगारात नवीन बसेसच्या आगमनाने प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. फलटण आगाराला १० नवीन एस.टी. बसेस मिळाल्या आहेत, या बसेसचे लोकार्पण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रवासी संघटना अध्यक्ष शिवलाल गावडे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, विभागीय सुरक्षा अधिकारी गायकवाड, प्रभारी व्यवस्थापक राहुल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव आहिवळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धिरज अहिवळे यांच्यासह बहुसंख्य चालक वाहक कर्मचारी, प्रवाशी उपस्थित होते.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की, फलटण शहरातील प्रमुख असणारे फलटण बसस्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत. राज्यातील इतर जे विकसित बसस्थानक आहेत त्याच्या धर्तीवर आपण फलटण बसस्थानकाचा विकास करणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी केली.

फलटण आगार व बस स्थानक इमारती जुन्या झाल्या असून वाढत्या प्रवासी संख्येसाठी त्या पुरेशा नसल्याने नवीन अद्ययावत, सुसज्ज व प्रशस्त इमारती उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या नवीन इमारतींमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांची सोय-सुविधा वाढेल.

फलटण आगारात गेल्या अनेक दिवसापासून बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्येला दूर करण्यासाठी आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने फलटण आगाराला नव्या २० बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात १० बसेस ह्या फलटण आगारात दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित १० बसेस येणाऱ्या काही दिवसात आगारात येतील, असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.