बनावट फोन पेद्वारे सोने खरेदी; गंडा घालणाऱ्या तरुणास अटक

0
1095
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | बनावट फोन पेद्वारे ज्वेलरी दुकानातून सोने खरेदी करून २२ हजारांना गंडा घालणाऱ्या तरुणाला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने काही तासांतच अटक केली.

फरीद राैफ बागवान (वय २४,रा. विक्रांतनगर, कोडोली, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरलक्ष्मी स्टाॅप येथील ब्रह्मचैतन्य ज्वेलरी शाॅप दुकानामध्ये दि. ६ रोजी फरीद बागवान हा सोन्याची कर्णफुले खरेदी करून दुकान मालकास फोन पेवरून पैसे ट्रान्सफर केले. त्याबाबतचा मेसेजही त्याने दाखविला.

त्यानंतर दुकानदाराने पैसे आले नसल्याचे त्याला सांगितले. आपण आता पकडले जाऊ, अशी शंका आल्याने त्याने दुकानातून तातडीने बाहेर जाऊन दुचाकीवरून पळ काढला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली होती. गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश यादव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयिताचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला. यानंतर पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदारांमार्फत फरीद बागवानची ओळख पटवली. तो शिवराज पेट्रोलपंप परिसरात राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने त्याला तातडीने अटक केली.