सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथील बाजार पटांगणातील भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले, तर तब्बल 20 लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दहिवडी येथील फलटण चौक ते सिद्धनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बाजार पटांगणावर मोहनलाल गुलाबचंद गांधी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या दुकानास अचानक आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत दुकानातील किराणा माल, साखर, तांदूळ, शेंगदाणे, गूळ, साबुदाणा, सर्व प्रकारच्या डाळी, साबण, ज्वारी, बाजरी, गहू, तेल डबे, इतर जीवनावश्यक साहित्य व शालेय स्टेशनरी, पशुखाद्य आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.
त्यात इमारतीच्या झालेल्या नुकसानीसह सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानाला लागलेल्या आगीची झळ शेजारच्या नवरंग साडी सेंटर दुकानालाही बसली. त्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.
आग आटोक्यात आणण्यासाठी म्हसवड नगरपरिषद व वडूज नगरपंचायतीचे अग्निशामक दलाचे बंब बोलविण्यात आले. त्यांनी संपूर्ण आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत आगीत सर्व जळून खाक झाले होते. याबाबतची तक्रार राजेंद्र मोहनदास गांधी यांनी दिली असून, या घटनेचा तपास सहायक फौजदार प्रकाश हांगे करत आहेत.