सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात असून नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत असतानाच दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत, महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना ‘जनतेने दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजे’ तसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजे,असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. त्यांनी कधी स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपलं कुटुंब मानलं. त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही. असं असताना अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छं विधानं करतात. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, हा सोलापूरकर कोण आहे? अशा लोकांना लाच पलीकडे काही समजत नाही, लावली जीभ टाळ्याला असा हा प्रकार आहे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात जे तेढ निर्माण होतं ते अशा विकृत लोकांमुळे होतं.
‘शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीजमधील लोकांनी थारा दिला नाही पाहिजे. मला वाटंत त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.