साताऱ्याच्या चाळकेवाडी पठारावर आढळली दुर्मीळ ‘हेमिडक्टायलस अमरसिंघी’ प्रजातीची पाल; काय आहेत वैशिष्ट्य?

0
222
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक दुर्मिळ अशी जीव आणि जंतू आहेत. तसेच पुरातन काळातील वस्तू शिल्प देखील आढळत आहेत. दरम्यान, साताऱ्यातील चाळकेवाडी पठारावर एका नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधक डॉ. थसुन अमरसिंघे यांचे वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून या नवीन पालीच्या प्रजातीला ‘हेमिडक्टायलस अमरसिंघी’ असे नाव देण्यात आले आहे.

साताऱ्यात आढळल्या दुर्मिळ पालीचा शोध हा पाच वर्षांच्या अथक संशोधनाचा परिणाम असून, भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद, राहुल खोत आणि जयदित्य पुरकायस्थ यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ ठरले आहे. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या नवीन प्रजातीच्या शोधामुळे महाराष्ट्रातील पठारावरील परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित होते. ही नवीन प्रजाती पाल स्थानिक, दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींसोबत या पठारात आढळते. चाळकेवाडी पठार हे बिबटे आणि अस्वलांसाठी येण्या-जाण्याचा मार्ग असून, स्थलांतरित पक्ष्यांसाठी आणि शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थान म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. ही पाल स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

कीटकभक्षक म्हणून ती मच्छर, कोळी व अन्य कीटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय, ही पाल शिकारी पक्षी, साप व लहान सस्तन प्राण्यांसाठी खाद्यसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे स्थानिक जैवविविधतेचे अस्तित्व टिकून राहते. या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. अमित सय्यद यांनी केले आहे. त्यांनी या आधीही भारतातील विविध जंगलातून बर्‍याच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. सातार्‍यातून आजपर्यंत त्यांनी चार नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये एक बेडूक, एक विंचू आणि दोन पालींचा समावेश आहे.

पालीचे वैशिष्ट्य काय?

साताऱ्यातील चाळकेवाडी परिसरात आढळली ही पाल पठारावरील दगडाखाली वास्तव्य करते. 4 इंच आकाराची ही पाल शेतातील पिकाला बाधक असलेल्या कीटकांना खाते. त्यामुळे परिसरातील भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ‘हेमिडक्टायलस अमरसिंघी’ ही पाल उपयोगी ठरते.

चाळकेवाडी अन् संशोधन…

अपोनोगेटॉन सातारेंसिस, हेमिडॅक्टायलस सातारेंसिस, सरडा सुपर्बा, तसेच या पठारावर रॅबडॉप्स अक्वाटिकस आणि लाओपेल्टिस कॅलमारिया या सापांच्या जातीही आढळतात. राओरचेस्टेस घाटेई या बेडकांचा शोधही या पठारावरूनच लागला आहे.