कराड प्रतिनिधी । पुतण्याच्या साखरपुड्याला दुचाकीवरून निघालेल्या काकाच्या कारच्या धडकेने मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. ढेबेवाडी- सणबूर मार्गावरील बनपुरी हद्दीत भीषण अपघाताची घटना सोमवारी सकाळी घडली.
पांडुरंग बाबूराव एकावडे (वय ५१, रा. एकावडेवाडी सळवे, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे. रेश्मा मानाजी रोडे (वय २६, रा. रोडेवाडी- मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण) या जखमी झाल्या. याबाबतची माहिती अशी की, एकावडेवाडी (सळवे) येथील पांडुरंग एकावडे यांच्या पुतण्याचा कळकेवाडी (ता. पाटण) येथे साखरपुडा असल्याने ते त्यांच्या विवाहित मुलगी रेश्मा मानाजी रोडे (वय २६, रा. रोडेवाडी- मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण) यांना घेऊन दुचाकीवरून (MH 50 W 5394) कळकेवाडीला निघाले होते.
ढेबेवाडी- सणबूर मार्गावर बनपुरी गावाजवळ आल्यावर समोरून आलेल्या कारने (एमएच ०३ ए डब्ल्यू ७०७०) दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही उडून बाजूला पडले. श्री. एकावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रेश्मा यांनाही अपघातात मार बसला होता. नागरिकांनी जखमींना तत्काळ कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पांडुरंग एकावडे यांचा मृत्यू झाला. जखमी रेश्मा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताबद्दल समजताच येथील सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी पोचून पंचनामा केला. अपघातात कार व दुचाकीच्या दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.