ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत योजनेच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक राहणार

0
292
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यात शेतक-यांसाठी अॅग्रीस्टॅक संकल्पना राबविणेस मान्यता दिली आहे. अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजीटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतक-यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजीटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उददेश आहे. प्रकल्पामुळे माहिती आधारीत योग्य निर्णय घेणे, गरजू शेतक-यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

तत्पुर्वी सर्व शेतक-यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधार जोडणी करून घ्यावी जेणेकरून शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्याची प्रक्रीया सोप्या पध्दतीने होईल. भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच PM किसान, पीक विमा, कृषी विभागाच्या सर्व वैयक्तीक लाभाच्या योजना इ. च्या लाभासाठी सर्व शेतक-यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील सदर कॅम्पमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.

अॅग्रिस्टॅक योजनेचे अपेक्षित फायदे पुढील प्रमाणे

PM-Kisan योजनेतील आवश्यक अटी पुर्ण करून शेतक-यास लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता.
PM-Kisan योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थीचा समावेश.
पिक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता.
पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्वेक्षणामध्ये सुलभता.
किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
शेतक-यांना सेवा देणा-या यंत्रणांना सदर सेवेसाठी सुलभता.
शेतक-यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले उपलब्ध होणे.
विविध संस्थांना शेतक-यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढ.

शेतक-यांना ‘या’ उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार

शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांची (CSC) मदत घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक व ग्राम विकास अधिकारी या क्षेत्रीय कर्मचारी यांच्या मार्फत गाव पातळीवर शेतक-यांच्या बैठका, कॅम्प घेऊन त्यामध्ये शेतक-यांना या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी तसेच मान्यवर व्यक्ती यांना देखील कॅम्पसाठी आमंत्रित केले जाणार आहे. बैठकीमध्ये, कॅम्पमध्ये ज्या शेतकरी ओळख क्रमांक काढावे लागतील अशी शेतकरी संख्या निश्चित करून प्रत्यक्ष शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र चालकाचा (CSC) स्वतंत्र कॅम्पचे आयोजन संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांचे समन्वयाने केले जाणार आहे.