कराड प्रतिनिधी । ‘भारत फोर्ज’चे चेअरमन पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणी यांनी सहकुटुंब त्यांच्या कराड तालुक्यातील मूळ गावी कोळे येथे नुकतीच भेट दिली. यावेळी कोळे गावाच्या विकास कामांसाठी लागेल तेवढी मदत मी करणार आहे. कोळे हे गाव माझे गाव असून हे गाव मला एक विशिष्ट ठिकाणी न्यायचे असून यासाठी गावकऱ्यांचे हातभार असणे गरजेचे आहे. कोळ्याचे नाव हे अभिमानाने मला घेता आले पाहिजे. कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे आहे त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे. भारत फोर्सच्या सी.आर. एस. फंडाच्या माध्यमातून लागेल ती मदत, लागेल ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे बाबासाहेब कल्याणी (Babasaheb Kalyani) यांनी म्हंटले.
बाबासाहेब कल्याणी हे पुण्याहून कुटुंबासह कोळे या मूळ गावी सकाळी 9. 40 वाजता हेलिकॉप्टरने कोळे गावांमध्ये दाखल झाले. गावामध्ये बाबासाहेब कल्याणी व सुनीता कल्याणी (वहिनीसाहेब) दाखल होताच गावकऱ्यांच्यावतीने सरपंच लतीफा अमानुल्ला फकीर यांनी त्यांचे स्वागत केले. साहेब खूप वर्षांनी गावामध्ये येत असल्याने ग्रामपंचायत कोळे व ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन रात्री दोन-दोन वाजेपर्यंत संपूर्ण गाव स्वच्छ करून साहेबांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. कोळेगावामध्ये हेलिकॉप्टर प्रथमच येत असल्याने बाल चिमुकल्याणसह संपूर्ण गाव हेलीपॅडच्या परिसरामध्ये दाखल झाले होते. तसेच बाबासाहेब कल्याणी गावामध्ये दाखल होताच संपूर्ण गावकऱ्यांच्यावतीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले.
तसेच भारत फोर्ज या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून झालेल्या कामाची कल्याणीसाहेब यांनी पाहणी केली. सी.एस.आर फंडामधून कोळे गावासाठी त्यांनी कोट्यावधीचा निधी आजवर दिला आहे.यामध्ये शाळा, पंढरपूर येथील घाडगेनाथ महाराजांच्या मठ, बंदिस्त गट्टर, पाणी योजना, सोलर प्लांट, काँक्रीटचे रस्ते यासह अत्यावश्यक लागणाऱ्या अनुषंगिक कामांनाही निधी दिला असून गावच्या विकासाला चालना देण्याचे काम बाबासाहेब कल्याणीसाहेब यांनी केले आहे. तसेच विकास कामाची पाहणी करत असताना जिल्हा परिषद शाळा कोळे (मुली) या शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत मन मोकळेपणाने गप्पा मारत फोटो सेशनही केले व विद्यार्थ्यांची विचारपूस त्यांनी आवर्जून केली.
यावेळी बाबासाहेब कल्याणी म्हणाले की, आमच्या आजोबांनी आमच्या घराण्याची सुरुवात या गावापासून केली आहे. लहानपणापासून गरिबी होती. त्यांची लोकांवर श्रद्धा होती. आणि त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही जे काही आज आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मला अभिमान वाटतो की या गावात माझा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी आम्ही या गावात होतो नंतर आम्ही कराडला गेलो आणि तेथून पुण्याला राहायला गेलो तरी कल्याणी परिवार या गावाचा आहे आणि या गावाचा सदैव राहील म्हणून मी माझ्या लोकांना सांगितले आहे.
ज्या ज्या सुधारणा आपल्या गावात करायला पाहिजे त्या आपण करायचे, पण त्यात एक अट आहे त्यात तुमचेपण हातभार लागला पाहिजे मग हे गाव आपण एका विशिष्ट स्टेजला घेऊन जाऊ अशी माझी इच्छा आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो इतक्या मोठ्या संख्येने आमचे स्वागत केले एवढ्या प्रेमाने आशीर्वाद दिले आणि असेच आशीर्वाद आमच्या परिवाराला सदैव राहूदे.या गावासाठी मी महादेवाकडे व घाडगेनाथ महाराजांकडे प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो असे सांगून कल्याणी आपले भाषण संपवले.
गावकऱ्यांनी केला सत्कार
या प्रसंगी कोळे ग्रामपंचायतीच्यावतीने आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोळे वि.वि.सो. आजी माजी चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक, सहकारी संस्था, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल यांचा वतीने पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणीसाहेब व त्यांच्या पत्नी सुनीता बाबासाहेब कल्याणी (वहिनीसाहेब), राजू कल्याणीसाहेब व यांचा पत्नी, तसेच महेश कल्याणी साहेब व त्यांच्या पत्नी प्रतिभा कल्याणी व देवांक कल्याणी यांचा सत्कार करण्यात आला .