कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील भोळेवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून शनिवारी रात्री बिबट्याने जर्शी कालवडीचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील भोळेवाडीसह शेडगेवाडी, विहे, बेलदरे शिवारात बिबट्याचा वावर काही महिन्यांपासून वाढला आहे. शनिवारी रात्री भोळेवाडी गावात बिबट्याने शिवाजी विठ्ठल सूर्यवंशी यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन वर्षांच्या जर्सी कालवडीवर हल्ला केला. बिबट्याने कालवडीला अक्षरशः दोनशे फूट फरफटत नेऊन गट नंबर १५१ येथील शिवारात ठार केले. कालवडीची मान व काळीज फाडून काही भाग खाल्लेला दिसून आला. सकाळी शिवाजी सूर्यवंशी, त्यांचे वडील विठ्ठल मारूती सूर्यवंशी यांच्या निदर्शनास ही बाब आली.
घटनेची माहिती गावातील लोकांनी वन कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर महिला कर्मचारी शीतल पाटील व वनपाल सागर कुंभार घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पंचनामा केला. परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालल्याने शेतकरी व महिला मजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.