केंद्रीय मंत्र्यांकडे मी सतत पाठपुरावा केल्याने घरकुलांचे उद्दिष्ट वाढले : खा. उदयनराजे भोसले

0
494
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गंत गरजवंत पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त घरकुलांचा लाभ मिळावा. यासाठी महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याला असलेले उदिष्ट वाढवून देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री ना.शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वांत जास्त उदिष्ट महाराष्ट्र राज्याला देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यालाही 45 हजार 422 घरांचे उदिष्ट मिळाले आहे. प्रशासनाने वाढीव उदिष्टपूर्तीकरीता विशेष प्रयत्न करुन घरकुलांपासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये, अशा सूचना प्रशासनाला केल्या असल्याची माहिती खा. उदयनराजेंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

खासदार उदयनरजे यांनी म्हटले आहे की, केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना नागरी क्षेत्रात नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात पंचायत समिती मार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन या योजनेचे उदिष्ट वाढवल्यास याचा लाभ अधिक कुटुंबांना होणार आहे. यामुळे या योजनेचे महाराष्ट्र राज्याच्या आणि विशेष करुन सातारा जिल्ह्याचे उदिष्टात वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांना विनंती केली होती.

राज्यातही महायुतीचे सरकार आणि केंद्रातही भाजपा आघाडीचे सरकार असल्याने, आमच्या मागणीला बळकटी मिळाली. ना.शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राला सन 2025-26 चे उदिष्टामध्ये वाढ केली आहे. त्याचा लाभ सातारा जिल्ह्यालाही मिळाला आहे. गेल्या 10 वर्षाातील उच्चांकी म्हणजेच 45 हजार 422 घरांचे उदिष्ट मिळाले आहे.

वाढीव उदिष्टामुळे सातारा जिल्ह्यातील पात्र गरजू कुटुंबे, स्वत:च्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. याकरता सातारा जिल्ह्यातील संबंधित प्रशासनाने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या योजनेचा नियमित आढावा घ्यावा. पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करुन, योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहचवण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही खा. उदयनराजेंनी प्रशासनाला केल्या आहेत.