सातारा प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा अगोदर ‘मातोश्री’मधून बाहेर पडावे आणि लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे, ते पाहावे. नुकत्याच झालेल्या विधानसभेत लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. एकनाथ शिंदे हे रुसणारे नाहीत. त्यांनी आपली ताकद २०२२ मध्ये अणि नुकत्याच झालेल्या विधानसभेला दाखविली आहे, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यावर सातारा येथे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात महायुती भक्कम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक आघाड्या लढत असतात. तथापि, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढाव्यात, यासाठी समविचारी नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राहील. नाशिक आणि रायगड वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या खेळीमेळीतून व समन्वयातून झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढविताना स्थानिकांना रोजगार ही प्राथमिकता आहे. पर्यटन वाढविताना पायाभूत सुविधा नव्याने विकसित कराव्या लागतात. हे करताना घनकचरा व्यवस्थापन, तसेच इतर बाबींच्या अनुषंगाने पर्यावरणाची ना-हरकत घेतली जाईल. नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारित महाबळेश्वर प्रकल्पाचा विस्तृत आढावा घेतला आहे. या प्रकल्पाला शिंदे यांच्या आदेशानुसार गती दिली जाईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.