ड्रायव्हिंगच्या शिकाऊ परीक्षेमध्ये 135 नापास; वाहतूक नियम, चिन्ह या माहितीचा अभाव

0
648
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । लर्निंग लायसन्ससाठी अनेक जण अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जधारकांची परीक्षा घेतली जाते. मात्र, वाहतूक नियमांची कसलीच माहिती नसल्यामुळे अनेक जण या परीक्षेत नापास होतात. गत वर्षभरात सुमारे १३५ जण लर्निंगच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना लर्निंग लायसन्स मिळालेले नाही.

वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स काढण्यासाठी सुरुवातीला लर्निंग लायसन्स काढावे लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जधारकांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत वाहतूक नियम, चिन्हांबाबतचे प्रश्न समाविष्ट असतात. मात्र, अनेकांना नियम आणि वाहतुकीच्या चिन्हांबाबत पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे सदरच्या परीक्षेत ते नापास होतात.

नापास झालेल्यांना लर्निंग लायसन्स दिले जात नाही. त्यासाठी त्यांना परत अर्ज करुन परीक्षा द्यावी लागते. कन्हऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गत वर्षभरात परीक्षा दिलेल्यांपैकी १३५ जण या परीक्षेत नापास झाले आहेत. लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा देण्यापूर्वी वाहतूक नियम, चिन्ह तसेच वाहनांबाबत असलेल्या नियमांची उमेदवाराला माहिती असणे आवश्यक आहे. त्याबाबतचे वाचन उमेदवाराने करणे गरजेचे असते.

सुमारे 700 जणांनी दिली परीक्षा

कहऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गत वर्षभरात सुमारे सातशे जणांनी लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा दिली आहे. त्यामध्ये अनेक जण पास झाले असून, त्यांना लायसन्स वितरित करण्यात आले आहे.

परीक्षार्थीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर…

ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर कॅमेऱ्यांची नजर असते. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसतो. वाहतूक नियमांबाबत जागरूक नसलेल्या उमेदवार नियमानुसार अपात्र ठरतात.

लर्निंग लायसन्ससाठी इन कॅमेरा ऑनलाइन परीक्षा

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी परिवहन कार्यालयात परीक्षा होते. ही परीक्षा कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असते. तसेच परिवहन अधिकाऱ्यांचे या परीक्षार्थीकडे लक्ष असते.