सातारा प्रतिनिधी । सध्या बाजारात नवीन तांदळाची आवक वाढली आहे. जानेवारी महिना संपत आला की नवीन तांदूळ बाजारात येऊ लागतो. त्यामुळे नवीनच्या दरात दोन ते चार रुपये उतार आलेला आहे; पण जुन्या तांदळाच्या दरात किलोमागे थोडीशी वाढ आहे. सातारा जिल्ह्यात नागरिकांकडून इंद्रायणी तांदळाचा वापर होतो.
जेवताना भात हवाच असतो. त्याशिवाय जेवण परिपूर्ण होत नाही असे म्हणतात. त्यामुळे शहरात तर घरोघरी दोनवेळा तरी जेवणाबरोबर भात असतो. त्यामुळे तांदळाला वर्षभर मागणी राहते. तांदळाचे बासमती, इंद्रायणी, कोलम, काली मूंछ, आंबेमोहोर असे अनेक प्रकार आहेत. ग्राहक पसंतीनुसार तांदळाची खरेदी करतात. तरीही सातारा जिल्ह्यात अधिक करून इंद्रायणी तांदळालाच मागणी असते. सध्या ग्राहकांना चांगले दिवस आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदळाचा दर कमी झालेला आहे.
बासमती अन् हरयाणा, पंजाब
सातारा जिल्ह्यात बासमती आणि कोलम तांदूळ वापरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बासमती हरयाणा आणि पंजाब राज्यांतून आयात होतो. काली मूंछ, आंबेमोहोर तांदळाला मागणी कमी असते.
इंद्रायणी राज्यातून…
इंद्रायणी तांदळाची आवक कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील मावळ, नाशिक जिल्ह्यातून आवक होत असते. यालाच अधिक पसंदी असते.
जुन्या तांदळाचा दर वाढ
बाजारात नवीन तांदूळ आवक वाढली आहे. त्या तुलनेत जुन्या तांदळाला मागणी असते. जुन्या तांदळात किलोमागे २ ते ४ रुपये वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
नवीनची आवक चांगली…
जिल्ह्यात स्थानिक तांदूळ कमी प्रमाणात विक्रीसाठी येतो. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील तांदळावर बाजारपेठेची भिस्त असते. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने तांदळाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले. नवीन तांदळाची आवकही वाढली आहे.
कराडचा ‘रेठरा बासमती ‘ब्रँड’
कराड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच दशकांपासून ‘रेठरा बासमती’ तांदळाची नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख देशभर पोहोचली असून, परदेशातही हा तांदूळ ‘ब्रँड’ ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रूक गाव वसले आहे. याठिकाणी १९६१ मध्ये कृष्णा कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना विभागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला. कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल वाढला. मात्र, १९७०च्या दशकात याच साखरपट्ट्यात ऊस सोडून ‘बासमती’ भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीही झाला.
तांदळाचे भाव काय? तांदळाचा प्रकार व किंमत प्रति किलो
बासमती तुकडा : ४०-७०
इंद्रायणी तुकडा : ३०-३५
इंद्रायणी अखंड : ५५-६०
कोलम : ५०-७०
काली मूंछ : ६०-७०
आंबेमोहोर : ७०-८०