सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या वसुली विभागाच्या वतीने शहरात सध्या करवसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. नोटीस बजावण्यात आलेल्यांनी तत्काळ कर ना भरल्यास त्यांचे नळ कनेक्शन तोडले जात आहेत. दरम्यान, कर वसूली विभागाच्या वतीने शुक्रवारी कारवाई करत मंगळवार पेठेतील 17 व गुरुवार पेठेतील दोन अशी 19 थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. तब्बल 1 कोटी 37 लाख 869 रुपयांची ही थकबाकी असल्याने वसुली विभागाला कारवाई करावी लागली.
वसुली विभागाचे प्रमुख उमेश महादार यांनी सातारा पालिकेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी थकीत घरपट्टी आणि नळपट्टी याकरता कारवाई सत्र गतिमान केले आहे. पालिकेने आज अखेर 26 कोटी 77 लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. पुढील 40 दिवसांमध्ये 12 कोटीचे उद्दिष्ट पालिकेला गाठावयाचे आहे. त्या दृष्टीने सातारा पालिकेने मंगळवार पेठेत आज 17 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट केले तसेच गुरुवार पेठ येथील दोघांचे नळ कनेक्शन सील करण्यात आले.
पालिकेच्या वसुली विभागाच्या वतीने तीन वेळा स्मरणपत्रे देऊनही वसुलीची कोणतीही प्रक्रिया न झाल्याने ही कारवाई करावी लागली. थकबाकीदार हे सर्व मंगळवार पेठेतील आहेत. थकबाकीदारांनी तात्काळ वसुली भरुन आपले नळ कनेक्शन पूर्ववत करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.