सातारा प्रतिनिधी | पुणे – बंगळूर महामार्गाच्या दुभाजकातील कराड – सातारा मार्गावरील मसूर फाटा, कोर्टी, इंदोलीसह परिसरातील शोभेची झाडे अज्ञातांकडून पेटविण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. भरदुपारी उन्हात आणि सायंकाळच्या वेळी अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीत अनेक झाडांचे नुकसान झाले. रस्ते देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो झाडे आगीपासून वाचविण्यात यश आले.
याबाबत माहिती अशी, सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे – कागल या मार्गावरील सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. सर्व यंत्रणा कामात व्यस्त असल्याचे पाहून महामार्गावरील दुभाजकात असणारी झाडेझुडपे व इतर वनसंपदा पेटवून नुकसान करण्याचे अज्ञातांकडून केले जात आहे. अचानक लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती समजताच तासवडे टोल व्यवस्थापनातील अण्णासाहेब थोरात, महेश चाबुकस्वार, सचिन देवकर, विक्रम ढाणे, अजित घारे, प्रदोष पाटील, सुजित जाधव, विजय शुक्ला, अजिंक्य कारंजकर, सिद्धांत साळेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नजीकचे पाणी टँकर बोलावून तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
यावेळी रस्ते देखभाल विभागाने तत्काळ केलेल्या मदतकार्यामुळे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला. मसूर फाट्यासह, कोर्टी, इंदोली, काशीळ, निसराळे आदी ठिकाणची दुभाजकातील झाडे जळून नुकसान झाले. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित होती.