स्कूलबसच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा पोलिस दल अलर्ट; कराडात ‘इतक्या’ केली स्कूलबसची तपासणी

0
637
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूलबसच्या मायमातून केली जाते. अशा स्कुलबसमधून खरोखरच विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे वाहतूक केली जाते का? विद्यार्थ्यांना चालकांकडून कोणता त्रास तर दिला जात नाही ना? अशा अनेक गोष्टीची सध्या तपासणी जिल्हा पोलीस दलाकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरून जिल्हा पोलिस दल पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील निर्भया पथकाने नुकतीच एक दिवसात कराड शहरातील तब्बल ५२ स्कूलबसची तपासणी केली.

निर्भया पथकाच्या वतीने यावेळी स्कुल बसचालकांना सूचना देतानाच स्कूलबसने शाळेत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. कोठेही कोणी तुमची छेड काढत असेल तर निर्भया पथकाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केले.

कराड शहर व परिसरात हजारो विद्यार्थिनी-विद्यार्थी स्कूलबसने किंवा खासगी रिक्षाने प्रवास करतात. सातारा येथे स्कूलबस चालकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी स्कूलबस तपासणीच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी तात्काळ निर्भया पथकाला बस तपासणीसाठी पाचारण केले. निर्भया पथकाने प्रत्येक शाळेत जाणारी स्कूलबस थांबवत मुलींशी संवाद साधला.

सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांनी सर्व स्कूलबस चालकांना एकत्र बोलवून त्यांना मुलांची सुरक्षितता ठेवण्याच्या सूचना दिल्या. कराड शहर व परिसरातील स्कूलबस चालकांनी निर्भया पथकाच्या मोहिमेस प्रतिसाद दिला. कराड शहराला सामाजिक वारसा असून त्याला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य घडणार नसल्याचे स्कूलबस चालकांकडून सांगण्यात आले.