एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयाच्या बसथांब्यावर मुलीस मारहाण; युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

0
2609
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अलीकडे एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यातून मुलींचे देखील छेडछाडीचे प्रकार घेत आहेत. अशीच एक घटना गुरुवारी विद्यानगर येथील एका महाविद्यालय परिसरात घडली. एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून मारहाण करत तिला ओढत नेण्याचा प्रयत्न युवकाने केला. महाविद्यालयाच्या बसथांब्यावर घडलेल्या या प्रकाराने मुलीच्या मैत्रिणींनी कराड उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या निर्भया पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर पथकाच्या वतीने संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) कायदा कलन्मावये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड शहरालगत विद्यानगर परिसरात अनेक महाविद्यालये असून यामध्ये हजारो युवक युवती शिक्षण घेण्यासाठी परिसरातून येत आहेत. महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात युवती आणि युवक एकत्रित येत असून काहीवेळा युवकांच्यामध्ये वादावादीच्या घटना देखील घडतात. दरम्यान, एका मुलीवर युवकाचे एकतर्फी प्रेम असल्याने अल्पवयीन मुलगी विद्यानगर येथे गुरुवारी बसथांब्यावर मैत्रिणींसमवेत बसची वाट पहात थांबली असताना अचानक त्याठिकाणी युवक आला. त्याने मुलीला धमकी देत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करून तिला ओढत त्याच्या गाडीकडे नेऊ लागला असता युवतीने आरडोओरड करण्यास सुरुवात केली.

हा गोंधळ सुरू असतानाच युवतीच्या मैत्रिणींनी प्रसंगावधान राखत कराड उपविभागीय कार्यालयाच्या निर्भया पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. निर्भया पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर मदतींसाठी फोन आल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, निर्भया पथकाच्या दीपा पाटील, मयूर देशमुख, अमोल फल्ले, हर्षद साळुंखे यांना वेळ न घालवता विद्यानगर येथे पाचारण केले.

निर्भया पथकाचे पथक पोलीस काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संशयित युवक मुलीस ओढत होता. निर्भया पथकाचे पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी युवकास ताब्यात घेतले. घडल्या प्रकाराची मुलीसह तिच्या मैत्रिणींकडून माहिती घेतली. यानंतर संशयित युवकास ताब्यात घेऊन उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले. अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून मारहाण करणाऱ्या संशयिताकडे स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी चौकशी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी संशयित मुलासह मुलीच्या पालकांना या प्रकाराबाबत माहिती दिली. निर्भया पथकाच्या अमित बाबर, दीपा पाटील यांनी युवतीचे समुपदेशन केले. यानंतर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात संशयितावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.